कारवाईची भीती दाखवून लाचेची मागणी, कोल्हापूर मनपातील अतिक्रमण विभागाच्या प्रमुखाला रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:56 IST2026-03-11T11:54:41+5:302026-03-11T11:56:08+5:30
साहित्य जप्त करण्याची दाखवली भीती, महापालिकेत खळबळ

कारवाईची भीती दाखवून लाचेची मागणी, कोल्हापूर मनपातील अतिक्रमण विभागाच्या प्रमुखाला रंगेहाथ अटक
कोल्हापूर : अतिक्रमण निर्मूलन कारवाईची भीती दाखवून पंधराशे रुपयांची लाच मागणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाच्या अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
विलास शामराव साळुंखे (वय ५५, रा. संतसेना महाराज नगर, फुलेवाडी) असे अटकेतील अधीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी केली.
रंगपंचमीच्या दिवशी एका विक्रेत्याने बाजार गेट परिसरात रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. त्यावेळी इस्टेट विभागाचे अधीक्षक तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाचा अतिरिक्त कार्यभार असलेला विलास साळुंखे याने संबंधित विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवली. स्टॉल लावायचा असल्यास १५०० रुपये लाच द्यावी लागेल, अन्यथा साहित्य जप्त करू, असे धमकावले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) सकाळी तक्रारदारासोबत पंचांना पाठवून लाच मागणीची पडताळणी केली. यात साळुंखे याने १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास बाजार गेट परिसरात सापळा लावला. अधीक्षक साळुंखे हा लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी येताच पथकाने त्याला दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
मागणीपेक्षा जास्त रक्कम स्वीकारली
साळुंखे याने १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताना तो सापडला. मागणीपेक्षा जास्त रक्कम स्वीकरण्याची ही पहिलीच घटना असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकाने तातडीने फुलेवाडी येथील त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली.