कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे, दिवाळीपूर्वी थकीत रकमेचा पहिला हप्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:52 IST2025-10-04T11:51:29+5:302025-10-04T11:52:39+5:30
कर्मचारी महासंघाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाचा थकीत रकमेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येईल, सेवानिवृत्त व मयत झालेल्या सफाई, झाडू कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यात येईल, आश्वासित प्रगती योजनेतील वेतन फरक देण्यात येईल यांसह १९ मागण्या मान्य झाल्याने शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी महासंघाने पुकारलेला संप मागे घेतला.
कर्मचारी महासंघाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता. यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच कर्मचारी संपावर गेल्याने महापालिकेच्या विविध आस्थापनांचे काम बंद पडले. कर्मचाऱ्यांनी सकाळी महापालिका चौकात येऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देत त्यांच्याबरोबर चर्चा केली. यात कर्मचाऱ्यांच्या १९ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता संप मागे घेण्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांनी केली. यावेळी संजय भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी संपावर.. दुपारनंतर कर्मचारी कामावर
महापालिकेचे कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच संपावर गेल्याने शहरासह उपनगरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले होते. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत शहरातील कचऱ्याचा उठावच झाला नाही. मात्र, संप मागे घेतल्यानंतर हे सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. रात्री साडेसात वाजेपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणच्या कचऱ्याचा उठाव केला. विशेष म्हणजे मिळेल ती यंत्रणा घेऊन कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कचरा उचलला.