कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती यांची निवड शुक्रवार किंवा शनिवारी होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयास सभापती निवडीची तारीख निश्चित करून मिळावी म्हणून पत्र पाठविले आहे. आज, सोमवारी त्याला संमती मिळाली तर पूर्ण तीन दिवसांची मुदत देऊन या निवडी केल्या जाणार आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली असून, भाजपच्या रुपाराणी निकम महापौर, तर जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग उपमहापौर झाले आहेत. आता महापालिकेच्या आर्थिक नाड्या ज्या समितीच्या हातात असतात, त्या स्थायी समितीच्या सभापतींसह परिवहन समिती तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापतींची निवड व्हायची आहे. या तिन्ही समित्यांवरील सदस्यांच्या निवडी दि. २० फेब्रुवारी रोजी झाल्या आहेत. या निवडी झाल्यानंतर नगरसचिव कार्यालयाने तत्काळ सभापती निवडीसाठी विशेष सभेची तारीख, वेळ व पीठासन अधिकारी नियुक्त करून द्यावेत, अशी विनंती विभागीय आयुक्तांकडे केली आहे.मागच्या आठवड्यातच हे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयास पोहचले आहे. शनिवार व रविवार सुटी असल्याने ही तारीख निश्चित झाली नाही. आता पुन्हा एकदा मंगळवारी होळीची सुटी असल्याने कदाचित आज, सोमवारीच सभेची तारीख, वेळ व पीठासन अधिकारी जाहीर केले जातील. या आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी तिन्ही सभापतींची निवडणूक लावली जाण्याची शक्यता आहे.स्थायी समिती सभापतीपद यावेळी भाजपकडे, तर परिवहन समिती सभापतीपद शिंदेसेनेकडे देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद कदाचित राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे दिले जाईल. मात्र, त्याबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही. परिवहन सभापतीपद शिंदेसेनेकडे दिले गेल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीने या सभापतीपदावर दावा केला असून, मानसी लोळगे यांचे नावदेखील त्यांनी निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.शिराळे, जाधव यांना संधीभाजपचे विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर यांची नावे स्थायी समिती सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी शिराळे व महाडिक या महाडिक परिवाराशी संबंधित आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकाची वर्णी लागणे शक्य आहे. परिवहन समितीकडून सत्यजित जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी तशी इच्छा बोलून दाखविली आहे. परंतु, राष्ट्रवादीनेही या पदावर दावा केल्याने यावर काेणता निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Summary : Kolhapur Municipal Corporation's standing, transport, and women/child welfare committee chair elections are expected Friday or Saturday. Names like Shirale and Jadhav are in contention for key positions, with potential coalition disagreements.
Web Summary : कोल्हापुर महानगरपालिका की स्थायी, परिवहन और महिला/बाल कल्याण समिति के अध्यक्षों के चुनाव शुक्रवार या शनिवार को होने की संभावना है। शिराले और जाधव जैसे नाम महत्वपूर्ण पदों के लिए प्रतिस्पर्धा में हैं, गठबंधन में संभावित असहमति भी हो सकती है।