Kolhapur-Local Body Election: सेना-काँग्रेसमध्ये चर्चा फिस्कटल्याने कागल पालिकेसाठी पंचरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:07 IST2025-11-22T16:05:01+5:302025-11-22T16:07:02+5:30
नगरसेवक पदाच्या २२ जागांसाठी ६५ उमेदवार : ४६ जणांनी घेतली माघार

Kolhapur-Local Body Election: सेना-काँग्रेसमध्ये चर्चा फिस्कटल्याने कागल पालिकेसाठी पंचरंगी लढत
कागल : कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडी आणि बैठका झाल्या. पण नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा फिस्कटल्याने सर्वांचेच अर्ज कायम राहिल्याने नगराध्यक्ष पदासाठी पक्षीय चिन्हावर चौरंगी लढत होणार आहे. तर, नगरसेवक पदाच्या २२ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी ४६ जणांनी माघार घेतली. अनेक प्रभागांत दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत होत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाच्या सविता प्रताप माने, शिंदे सेनेच्या युगंधरा महेश घाटगे, काँग्रेसच्या गायत्री इगल प्रभावळकर आणि उद्धव सेनेच्या शारदा धनाजी नागराळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे. राजर्षी शाहू आघाडीच्या उषा रावण, अपक्ष विद्या गिरीगोसावी आणि राणी सोनुले यांनी अर्ज माघार घेतले. नगरसेवक पदासाठी काँग्रेसने भरलेले दोन अर्ज माघार घेतले आहेत. शिंदे सेनेच्या व उद्धव सेनेचेही उमेदवार कायम आहेत. काही अपक्षही रिंगणात कायम राहिले आहेत.
युतीचा फोकस अपक्षांवर
शिंदे सेनेत व उद्धव सेनेत एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरु असताना मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीने अपक्ष उमेदवारांवर लक्ष केंद्रित करीत माघारीसाठी प्रयत्न केले. दुपारी दोनच्या सुमारास एकास एक लढती होणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर युतीने माघारीसाठीचा पाठपुरावाही कमी केला.
८ ठिकाणी दुरंगी लढती
नगरसेवक पदासाठी प्रभाग १ब, प्रभाग २ब, प्रभाग ४ब, प्रभाग ५ब, प्रभाग ६ब, प्रभाग ७ब, प्रभाग १०ब, प्रभाग ११ब या ठिकाणी थेट दुरंगी लढत होत आहे. तर प्रभाग ३ब व प्रभाग ५अ मध्ये पंचरंगी लढत होत आहे. इतर तिरंगी व चौरंगी लढती आहेत. प्रभाग ९ब बिनविरोध झाला आहे. या प्रभागात एका जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.