Kolhapur-Local Body Election: शिरोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काटाजोड चौरंगी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:10 IST2025-11-22T16:10:06+5:302025-11-22T16:10:46+5:30
चिन्हवाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणांगण तापणार

Kolhapur-Local Body Election: शिरोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काटाजोड चौरंगी निवडणूक
शिरोळ : शिरोळ पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढतीचा सामना स्पष्ट झाला आहे; तर नगरसेवकपदासाठी तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीत १० अपक्ष उमेदवार उतरले आहेत. उमेदवारी अर्जमाघारीच्या अंतिम दिवसअखेर नगराध्यक्षपदाच्या तीनजणांनी, तर नगरसेवकपदाच्या ३९ जणांनी माघार घेतली. निवडणुकीचे रणांगण स्पष्ट झाल्यामुळे आता चिन्हवाटपानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.
शिरोळ पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसअखेर नगराध्यक्षपदासाठी नऊ, तर नगरसेवक पदासाठी ११० अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर दोन्ही गटांतील ११६ अर्ज शिल्लक राहिले. गेल्या तीन दिवसापासून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी तीन, नगरसेवक पदासाठी ३९ जणांनी माघार घेतली. अनेक प्रभागांमध्ये माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यात आली. साम, दाम, दंडाचादेखील वापर झाला. माघारीनंतर शिवशाहू आघाडी, ताराराणी आघाडी, तसेच राजर्षी शाहू विकास आघाडीत तिरंगी लढतीचा सामना होत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी योगिता कांबळे, श्वेता काळे, सारिका माने, करुणा कांबळे अशी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ब मधून ताराराणी आघाडीने माघार घेतली; तर बहुतांश प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग दोनमध्ये एक, प्रभाग तीनमध्ये दोन, प्रभाग चारमध्ये तीन, पाच एक, प्रभाग सहा एक, प्रभाग आठ एक, प्रभाग नऊ एक, प्रभाग दहामध्ये एक असे दहा अपक्ष रिंगणात उतरले आहेत. प्रभाग तीनमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार निवडणूक चिन्हावर उभा आहे. बुधवारी (दि. २६) चिन्हवाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणांगण तापणार आहे.