Kolhapur: दीपोत्सवाने उजळला पन्हाळगड; मावळ्यांनी सादर केली मर्दानी खेळ, तलवारबाजीची प्रात्यक्षिके -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:14 IST2025-10-18T15:12:39+5:302025-10-18T15:14:02+5:30
कोल्हापूर हायकर्सतर्फे आयोजन; सलग तेरा वर्षे उपक्रम

Kolhapur: दीपोत्सवाने उजळला पन्हाळगड; मावळ्यांनी सादर केली मर्दानी खेळ, तलवारबाजीची प्रात्यक्षिके -video
पन्हाळा: कोल्हापूर हायकर्सतर्फे पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी मंदिर व सज्जा कोठी या ठिकाणी दीपावलीनिमित्त सलग तेराव्या वर्षी इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते व दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे पूजन करून व पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला. यावेळी पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार-माळी, शिवप्रेमी उपस्थित होते.
सर्व जण दिवाळी नेहमी घरात साजरी करतात; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला. त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमके हेच हेरून कोल्हापूर हायकर्सतर्फे गेल्या बारा वर्षांपासून पन्हाळा गडावर वसुबारसेच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. या परिवारातर्फे २०१३ पासून सुरू केलेला 'एक सांज पन्हाळगडावर' हा अनोखा उपक्रम यंदा सलग तेराव्या वर्षी यशस्वीरीत्या संपन्न झाला.
वर्षभर गड किल्ल्यावर दुर्ग संवर्धन व पदभ्रमंती तसेच विविध साहसी क्रीडा प्रकार आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप अशी कोल्हापूर हायकर्सची ओळख आहे. किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावे, यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. जुन्या बुधवारातील शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्राच्या मर्दानी आखाड्याच्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ व तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी इंद्रजित सावंत यांनी पन्हाळगडाचा अभ्यास पूर्ण इतिहास मांडला.
दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर हायकर्सच्या सर्व सदस्यांसह अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील, श्रावणी पाटील, सूर्यकांत देशमुख, इंद्रजित मोरे, विजय ससे, सेजल जाधव, समर्थ जाधव, शुभम घनतडे, प्रतीक कांबळे, प्रतीक्षा कांबळे, वृषाली मगदूम, नूतन पाटील, सागर पाटील, अवंती राजहंस, हनिफ नगारजी यांनी परिश्रम घेतले.