कोल्हापूर :घरगुती वापराचा गॅस वाहनांत भरल्याप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 19:40 IST2018-08-16T19:38:33+5:302018-08-16T19:40:16+5:30
रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली.

कोल्हापुरात बुधवारी (दि. १५) घरगुती वापराचा गॅस रिक्षामध्ये भरल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवार पेठ परिसरात कारवाई करून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रिक्षांसह गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले.
कोल्हापूर : रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली.
या प्रकरणी संशयित मालक अविनाश शंकर सणगर (वय ३५, २८००, बी वॉर्ड, मंगळवार पेठ), रिक्षाचालक अभिजित चंद्रकांत मोहिते (३३, रा. १३४३, बी वॉर्ड, दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ), सूर्यकांत मल्लाप्पा कानडे (४५, रा. प्लॉट नंबर ४२, रामानंदनगर, कोल्हापूर) व अभितज चंदर डवरी (२२, रा. निढोरी, ता. कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून दोन रिक्षा, १३ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे, गॅस भरण्यासाठी लागणारी एक इलेक्ट्रिक मोटर, हायप्रेशर रेग्युलेटर असा सुमारे ७५ हजार रुपयांचा माल जप्त केला. या चौघांना आज, शुक्रवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
अटक केलेल्या सणगरवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आठजणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले असून, संशयित रोहन सुभाष मंडलिक (वय ३६, रा. टेंबलाईवाडी), राजेश ईश्वर जाधव (२४, रा. टेकोली, ता. शाहूवाडी) व वाजित सलीम फरास (रा. गोदावरी अपार्टमेंट, पाचगाव , ता. करवीर) या तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवार पेठ राधाकृष्ण मंदिरजवळ रोहन मंडलिक हा अविनाश सणगर यांचे गॅस सिलिंडर व अन्य साहित्यासह आढळून आला. याप्रकरणी अविनाश सणगर, रिक्षाचालक अभिजित मोहिते या दोघांना पकडले तर संशयित मंडलिक हा पसार झाला. याचवेळी रिक्षाचालक सूर्यकांत कानडे व अभितज डवरी हे दोघे मिळून आले. याप्रकरणी एकूण चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण दहा सिलिंडर व गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले.
दरम्यान, मिरजकर तिकटीजवळील हसूरकर यांच्या दवाखान्याशेजारी संशयित राजेश जाधव हा मालक वाजित फरास घरगुती गॅस भरत होता. पोलीस आल्याचे पाहून हे दोघे पसार झाले. या ठिकाणी तीन भरलेल्या सिलिंडरसह साहित्य मिळून आले. जाधव व फरास या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण भोसले, सरोजिनी चव्हाण, उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, ज्योत्स्ना भांबिष्टे, हेड कॉन्स्टेबल डी. पी. इदे, सलीम शेख, एकनाथ चौगले, बजरंग लाड, सचिन देसाई, रंगराव चव्हाण, आदींनी केली.