मदतीसाठी एक कॉल आला अन् पूरग्रस्त सोलापूरकरांसाठी धावले कोल्हापूरकर, १८० जणांना सुखरुप बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:07 IST2025-09-24T12:04:42+5:302025-09-24T12:07:21+5:30
दिवसभरात १८० हून अधिक जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढले

मदतीसाठी एक कॉल आला अन् पूरग्रस्त सोलापूरकरांसाठी धावले कोल्हापूरकर, १८० जणांना सुखरुप बाहेर काढले
कोल्हापूर : स्थळ कोल्हापूर.. तारीख २२ सप्टेंबर..वार सोमवार..वेळ सायंकाळी १० ची..सोलापूर जिल्हा व्यवस्थापनातून एक कॉल येतो, आमच्याकडे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे, गावागावांमध्ये लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तुम्ही याल का..बस्स..इतके शब्द कानावर पडले अन् कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापन आणि व्हाईट आर्मीच्या जवानांनी आहे त्या कपड्यावर सोलापूरची वाट धरली.
मध्यरात्री उत्तर सोलापूर, माढा तालुक्यातील गावांमध्ये पोहोचलेल्या कोल्हापूरकर जवानांनी मंगळवारी सकाळीच पुराच्या पाण्यात उतरत दिवसभरात १८० हून अधिक जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढले. ज्या काळात कोल्हापूरकर महापुराच्या विळख्यात होते त्या काळात याच सोलापूरकरांनी दातृत्वाची ओंझळ रिकामी केली होती. आता सोलापूरकर संकटात असताना आम्हाला हे उत्तरदायित्व निभावावेच लागेल, असे सांगत करत शेवटचा व्यक्ती बाहेर काढल्याशिवाय मायभूमीत परतणार नसल्याचा निर्धार कोल्हापूरकर जवानांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करणे आव्हान बनले आहे. कोल्हापुरातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व व्हाईट आर्मीच्या जवानांना फ्लड रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव असल्याने सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने त्यांना सोमवारी मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. या आवाहनानुसार कोल्हापूरकर सोलापूरकरांच्या मदतीला धावले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व कोल्हापूरमधील व्हाईट आर्मीची अथकपणे राबत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी मंगळवारी सायंकाळी शिंगेवाडी (ता. माढा) येथे पुरात अडकलेल्या २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली तर व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सचिन भोसले, विनायक भाट, सुनील जाधव, हनुमंत कुलकर्णी, प्रदीप ऐनापुरे यांच्या टीमने माढा तालुक्यातील उंदरगावमध्ये १८० नागरिकांची सुटका केली.
कोल्हापूरच्या बोटीही सोलापूरकरांच्या मदतीला
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी मंगळवारी सोलापूरला पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. अजून काही बोटी पाठवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
कोल्हापूरकर महापुराच्या संकटात असताना सोलापूर व मराठवाड्यातील नागरिकांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे आता ते संकटात असताना आपण मदतीला धावून जाणे कर्तव्य आहे. व्हाईट आर्मीचे सहाजण तेथे बचावकार्य करत आहेत. - अशोक रोकडे, संस्थापक, व्हाईट आर्मी, कोल्हापूर.