कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ मतदानावेळी 'सरांना' पोलिसांची 'छडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 11:50 AM2022-07-09T11:50:06+5:302022-07-09T11:58:48+5:30

गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती.

Kolhapur District Madhyamik Shikshan Sevak Sahakari Patsanstha was beaten by the police during the voting | कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ मतदानावेळी 'सरांना' पोलिसांची 'छडी'

छाया : आदित्य वेल्हाळ

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व न्यू मराठी हायस्कूल या शाळांतील २२ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आले. दरम्यान, गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला. यावेळी मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

‘कोजिमाशि’साठी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत आहे. गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. साम, दाम, दंड या नीतीचा दोन्ही पॅनलकडून वापर झाला. त्यामुळे ‘सर’ कोणाच्या पदरात आपले मताचे दान टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.

शहर, हातकणंगले, करवीर, कागलवर मदार

पतसंस्थेचे ८५२० सभासद आहेत. त्यांपैकी सर्वाधिक १६७४ हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. कागल ९२६, करवीर ८९२, तर कोल्हापूर शहरात ८३३ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून चार ठिकाणीच ताकद लावली गेली. येथे कोण बाजी मारणार, त्याचीच सत्ता पतसंस्थेत येणार, हे निश्चित आहे.

तालुकानिहाय मतदान असे

कोल्हापूर शहर - ८३३, करवीर - ८९२, हातकणंगले - १६७४, कागल - ९२६, राधानगरी - ६२९, भुदरगड - ५५५, पन्हाळा - ७१७, शाहूवाडी - ३५४, शिरोळ - ७००, गडहिंग्लज - ४२१, आजरा - २०७, चंदगड - ३९०, गगनबावडा - १४०, स्वामी शिक्षण संस्था -७६, रयत शिक्षण संस्था- ६

Web Title: Kolhapur District Madhyamik Shikshan Sevak Sahakari Patsanstha was beaten by the police during the voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.