कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात वाढले १२ हजार नवमतदार, सर्वाधिक नोंदणी कोणत्या मतदारसंघात... वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:48 IST2025-10-15T18:47:47+5:302025-10-15T18:48:13+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात वाढले १२ हजार नवमतदार, सर्वाधिक नोंदणी कोणत्या मतदारसंघात... वाचा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील वर्षभरात १२ हजार ४११ नवमतदार वाढले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे नवमतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली आहे.
नव्याने मतदार नोंदणी, मयत, दुबार नावे काढून टाकणे, नाव, पत्त्यात बदल ही प्रक्रिया निरंतन सुरू असते. जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने वर्षभर हे काम केले जाते. त्यासाठी आयोगाने ऑनलाइन अर्जांचीदेखील साेय केली आहे. शिवाय महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी केली जात आहे. प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या या पुढाकारामुळे लाेकसभा व विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यातून उच्चांकी मतदान झाले. त्यानंतरदेखील नियमितपणे मतदार नोंदणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मागील वर्षभरात जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील १२ हजार ४११ नवमतदारांची नोंदणी झाली आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात कमी
नवमतदार नोंदणीत वर्षभरात कोल्हापूर उत्तर सर्वात मागे आहे. उत्तर हा मतदारसंघ कोल्हापूर शहरात येतो. शहरातील तरुणाई मतदार नोंदणीबाबत उदासीन आहे असेच दिसून येते. येथे फक्त ६७६ नवमतदारांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ चंदगड, आणि कोल्हापूर दक्षिणचा नंबर लागतो.
शिरोळ सर्वात पुढे..
नवमतदार नोंदणीत ग्रामीण भाग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. यात शिरोळमध्ये सर्वाधिक २००४ त्यानंतर करवीर आणि हातकणंगलेमध्ये नवमतदारांची संख्या वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी १ जुलैची मतदार यादी
दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. त्यासाठी १ जुलै २०२५ या दिवसापर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्या नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
विधानसभा मतदारसंघ : १८-१९ वयोगटातील वाढलेले मतदार
- शिरोळ : २००४
- करवीर : १३८१
- हातकणंगले : १३४३
- राधानगरी : १३२६
- कागल : ११८१
- इचलकरंजी : ११७७
- शाहुवाडी : ११४२
- कोल्हापूर दक्षिण : १११८
- चंदगड : १०६३
- कोल्हापूर उत्तर : ६७६
एकूण : १२ हजार ४११