Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:44 IST2025-05-08T12:44:17+5:302025-05-08T12:44:45+5:30
डोंगळे यांची २५ मेपर्यंत मुदत

Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभारी (अध्यक्ष) बदलणार हे निश्चित असून या ठिकाणी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील की बाबासाहेब चौगले यांना संधी द्यायची हे नेतेच ठरवणार आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची अध्यक्षपदाची नेत्यांनी ठरवून दिलेली मुदत २५ मे रोजी संपत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या झालेल्या निवडणुकीत विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे विरोधी आघाडीत सामील झाल्याने सत्तेचे गणित सोपे झाले होते. दोघांना सोबत घेताना सत्तेनंतर प्रत्येकाला दोन-दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार विश्वास पाटील यांच्या दोन वर्षांनंतर डोंगळे यांना संधी मिळाली. त्यांची मुदत संपत आल्याने नवीन अध्यक्ष कोण ? याविषयी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपद आणखी एक वर्ष मिळावे, यासाठी अरुण डोंगळे हे प्रयत्नशील आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने फायदा होईल, असे त्यांना वाटते; पण तशी मानसिकता नेत्यांची नाही. डोंगळे यांना मुदतवाढ दिली तर विश्वास पाटील यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे ठरलेल्या फाॅर्मुल्यानुसारच प्रत्येकाला संधी मिळणार आहे.
आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने विरोधक आक्रमक होणार आहेत. निवडणुकीच्या जोडण्या लावणारा चेहरा नेत्यांना द्यावा लागणार आहे. सत्तारूढ गटात डोंगळे, विश्वास पाटील व बाबासाहेब चौगले हे जुने चेहरे आहेत. विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी विश्वास पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
जिल्ह्यातील ठरावधारकांशी त्यांचा थेट सबंध आहेच, त्याचबरोबर पॅनलसाठी जोडण्या लावण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्याचा फायदा पॅनलला होऊ शकतो. त्यातून त्यांचे नाव पुढे येऊ शकते. पाचव्या वर्षी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची ठरली, तर आमदार सतेज पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौगले हे बाजी मारणार. विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्या सहकार्याने त्यांना निवडणुकीला सामोरे करण्याची रणनीती नेत्यांची असू शकते.
मुदतीअगोदरच राजीनामा देणार?
विश्वास पाटील यांनी दोन वर्षांची मुदत संपण्याआधीच नेत्यांकडे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तीच परंपरा अरुण डोंगळे राखण्याची शक्यता आहे.