कोल्हापूर :  गाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:55 PM2018-10-25T13:55:36+5:302018-10-25T13:58:47+5:30

एफआरपी अधिक २00 रुपये सूत्राप्रमाणे गेल्या हंगामातील उसाची बिले काही कारखान्यांनी थकवली असतानाही प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पूर्ण एफआरपी दिल्याची माहिती कळवली आहे, अशाप्रकारे खोटी माहिती देऊन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, त्यांचे गाळप परवाने थांबवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

Kolhapur: Demand for the shutdown of slip licenses, movement of Swabhimani Shetkari Sanghatana | कोल्हापूर :  गाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

कोल्हापूर :  गाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Next
ठळक मुद्देगाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनखोटी माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : एफआरपी अधिक २00 रुपये सूत्राप्रमाणे गेल्या हंगामातील उसाची बिले काही कारखान्यांनी थकवली असतानाही प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पूर्ण एफआरपी दिल्याची माहिती कळवली आहे, अशाप्रकारे खोटी माहिती देऊन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, त्यांचे गाळप परवाने थांबवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

संघटनेतर्फे बुधवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात अचानक आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांनी प्रभारी साखर उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना निवेदन दिले. साखर सहसंचालक सचिन रावळ हे परगावी असल्याने पुढील दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन कारखान्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

संघटनेतर्फे भगवान काटे, अजित पोवार यांनी प्रभारी संचालक खांडेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत एफआरपी थकवणाऱ्या  कारखान्यांची माहिती मागितली. खांडेकर माहिती देत असताना महाडिक शुगर्स, इको केन आणि गायकवाड कारखान्यांनी एफआरपी अधिक २00 नुसार दर दिले नसल्याचा मुद्दा काटे व पोवार यांनी मांडला.

यावर खांडेकर यांनी महाडिक शुगर्सच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून वस्तूस्थिती जाणून घेतली असता एफआरपी दिली आहे; पण २00 चा हप्ता काही शेतकऱ्यांना देणे थकीत असल्याची कबुली दिली. यावर संतप्त झालेल्या पोवार व काटे यांनी खोटी माहिती का दिली, तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, अशा शब्दांत दम भरला.

काटे यांनी तर खांडेकर यांना धारेवर धरत साखर सहसंचालक सचिन रावळ आल्यानंतर तातडीने या तीन-चार कारखान्यांवर कारवाईचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांकडे पाठवा, असा दम भरला. यावर खांडेकर यांनी तातडीने साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवू, असे सांगितले.

२00 रुपये देतानाच नाकी दम आल्याचे महाडिक शुगर्सच्या अधिकाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न केला. यावर संतापलेल्या अजित पोवार यांनी तुमच्या साखरेचे दर उतरले म्हणून तुमचा तोटा वाढला, असे म्हणता, मग खतांच्या किमती भरमसाट वाढल्या, भांगलणीची मजुरी वाढली, विजेच्या किमती वाढल्या, त्याची भरपाई कोण देणार ?, ऊस घेताना दर जास्त देतो म्हणून घोषणा करून, ऊस उचलणार आणि प्रत्यक्षात मात्र कमी दर देणार, हा तुमचा उफराटा न्याय आम्ही का सहन करायचा?, गोड बोलून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये, असे सुनावले.

 

Web Title: Kolhapur: Demand for the shutdown of slip licenses, movement of Swabhimani Shetkari Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.