कोल्हापूर : स्कूल बस अपघातातील जखमी मदतनिसाचा अखेर मृत्यू , मृतांची संख्या चारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 18:15 IST2018-06-29T17:42:16+5:302018-06-29T18:15:01+5:30
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा मुडशिंगी गावावर दु:खाचे सावट पसरले.

कोल्हापूर : स्कूल बस अपघातातील जखमी मदतनिसाचा अखेर मृत्यू , मृतांची संख्या चारवर
कोल्हापूर/गांधीनगर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा मुडशिंगी गावावर दु:खाचे सावट पसरले.
हृषीकेश दयानंद कांबळे
तीन दिवसांपूर्वी कंटेनर-स्कूल बस यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये स्कूल बस चालक, कंटेनर चालक व क्लीनर हे तिघे ठार झाले; तर २२ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पाच विद्यार्थी उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्कूल बसमधील मदतनीस हृषीकेश कांबळे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्यांचा शुक्रवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत मृतांची संख्या चारवर गेली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
अवयवदान करता आले नाही
मृत कांबळे यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बंगलोर व मुंबई येथील डॉक्टरांची विशेष पथके कोल्हापुरात आली. त्यांनी मृतदेह पाहिला असता सर्व अवयव निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अवयवदान करता आले नाही. हृषीकेशवर वयाच्या दुसऱ्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. सीपीआर रुग्णालयातील सर्जरी झालेला पहिला मुलगा असल्याने त्याचा तत्कालीन आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
एकुलत्या मुलाचा मृत्यू
हृषीकेश कांबळे याचे वडील खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आई-वडील आणि बहीण असे त्याचे कुटुंब. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तो आजोळ कुंभोज (ता. हातकणंगले) येथे आजोबा बापूसाहेब भोसले यांच्याकडे राहत होता. त्याने पदवीच्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले.
गेल्या सहा वर्षांपासून संजय घोडावत स्कूलमध्ये वॉर्डबॉय म्हणून तो नोकरी करीत होता. दुसऱ्यांना मदत करणारा, शांत आणि मनमिळावू असा त्याचा स्वभाव होता. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कांबळे कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.