Kolhapur: सीआर पोर्टल हातात...१८ लाखांचे १५० मोबाइल शोधले महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:16 IST2025-06-20T16:14:09+5:302025-06-20T16:16:01+5:30
सायबर पोलिसांकडून परत देण्याची प्रक्रिया सुरू

Kolhapur: सीआर पोर्टल हातात...१८ लाखांचे १५० मोबाइल शोधले महिन्यात
कोल्हापूर : गहाळ झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीआर (CEIR) पोर्टलचा वापर सुरू केला आहे. या पोर्टलच्या मदतीने गेल्या एका महिन्यात १८ लाख रुपये किमतीचे १५० मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले.
संबंधित मोबाइल मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली. तसेच चोरीला गेलेल्या बहुतांश मोबाइलची विक्री आसपासच्या जिल्ह्यांत झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले.
मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासह चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सायबर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर पोलिसांनी सीआर पोर्टलच्या मदतीने मोबाइलचा शोध सुरू केला. गेल्या महिनाभरात चोरीतील १५० मोबाइल पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोर्टलद्वारे मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १५० मोबाइल जप्त केले. संबंधित मोबाइल मूळ मालकांना परत देण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू झाली. अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते १० जणांना त्यांचे मोबाइल परत देण्यात आले. उर्वरित १४० जणांना शुक्रवारपासून मोबाइल परत दिले जाणार आहेत, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.
निरीक्षक होडगर यांच्यासह उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, सहायक फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, रवींद्र पाटील, सागर माळवे, अमर वासुदेव, अमर आडसुळे, संगीता खोत, आदींच्या पथकाने मोबाइलचा शोध घेतला.
असे शोधले मोबाइल
चोरीला गेलेल्या मोबाइलचा आयएमईआय नंबर, आधार नंबर टाकताच सीआर पोर्टल २४ तास या नंबरचा शोध घेत राहते. मोबाइल सुरू होताच सायबर पोलिसांना मेसेजद्वारे त्यातील सीमकार्डचा नंबर मिळतो. त्यावरून पोलिसांना लोकेशन काढून संबंधितांपर्यंत पोहोचता येते. यापूर्वी दर तीन महिन्यांनी सीमकार्ड कंपन्यांना चोरीला गेलेल्या मोबाइलची माहिती पाठवून त्याचा पाठपुरावा करावा लागत होता. सीआर पोर्टलद्वारे तपासाचे काम गतिमान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संचारसाथी पोर्टलचा वापर करा
केंद्र सरकारने संचारसाथी पोर्टलची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. यात चोरीला गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा आयएमईआय नंबर टाकताच याची तक्रार इंडियन सायबर कोऑर्डिनेशन सेंटरकडे नोंदवली जाते. यातून मोबाइलचा शोध घेण्यास मदत होते. तसेच आपल्या नावावर खरेदी झालेले सीमकार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीबद्दल तक्रार देता येते. नागरिकांनी या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.