रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 00:00 IST2025-11-17T23:13:10+5:302025-11-18T00:00:04+5:30
Sangli News: लक्ष्मण दुधाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी येथील कोंडीबा क्षीरसागर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी
ढालगांव, (वार्ताहर) : रायवाडी ता. कवठेमहांकाळ येथील कोंडीबा शंकर क्षीरसागर यांच्या शेतात रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रम सुरू असताना दोन गटात जोरदार मारामारी झाली असून त्यांनी कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध फिर्यादी दाखल केल्या आहेत.
या मारहाणीत एका गटाचे चार जण जखमी झाले आहेत तर दुसऱ्या गटाच्या एकाला मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याच्या तक्रारी कवठेमहाकाळ पोलिसांत नोंद झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की रायेवाडी येथील कोंडीबा शंकर क्षीरसागर यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, अंत्यविधीचा कार्यक्रम झाला होता. मात्र रविवारी रक्षा विसर्जनाचा दिवस होता. रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम सुरू असतानाच मयत कोंडीबा क्षीरसागर यांच्या चुलत आजी शालाबाई शंकर क्षीरसागर, तिथे आलेल्या सावत्र मुलगा पंडित क्षीरसागर यास तू इथे थांबू नकोस व याला हात लावू नकोस असे म्हणत होत्या. तेव्हा तिथे आलेल्या लक्ष्मण दुधाळ, मारूती दुधाळ व अतुल दुधाळ यांनी शालाबाई यांना तुम्ही असे कशाला म्हणता म्हणून विचारणा केली. याला तुम्ही इथे पाहुणे म्हणून आलाय काही एक विचारू नका, असे शालाबाई यांनी म्हणताच लक्ष्मण दुधाळ, मारुती दुधाळ,अतुल दुधाळ यांनी आनंदा क्षीरसागर यांना मानेवर, मनगटावर , हाताने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.
लक्ष्मण दुधाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी येथील कोंडीबा क्षीरसागर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान रविवारी लगेचच त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. या रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण दुधाळ यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ आले होते. यावेळी शालन शंकर क्षीरसागर या लोकांना शिवीगाळ करत आल्या. दरम्यान विश्वनाथ दुधाळ यांनी कशाला शिव्या देता, असे म्हणताच त्याचा राग आनंदा राजाराम क्षीरसागर याला आला. त्याने तेथील स्टीलची कळशी घेऊन लक्ष्मण दुधाळ यांच्या डोक्यात मारली. यावेळी सरपंच राजेश काशिनाथ पडळकर हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना राजाराम शामराव क्षीरसागर यांनी त्यांच्या हातातील काठीने मारहाण केली. मारुती दुधाळ यांना मायाप्पा शामराव क्षीरसागर यांनी मारहाण केली. आनंदा क्षीरसागर यांनी स्वाती कोंडीबा क्षीरसागर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.