कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:15 IST2025-08-14T12:14:50+5:302025-08-14T12:15:53+5:30
प्रोटोकॉल समितीकडून पाहणी, अधिकाऱ्यांसोबत बैठक, सुरक्षेबद्दल सूचना

कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला
कोल्हापूर : सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठीच मेरी वेदर ग्राउंडवर याचे आयोजन केले आहे. हा समारंभ सर्वांसाठी खुला आहे. मात्र, उपस्थितांना शिष्टाचार पाळावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. सर्वोच्च न्यायलय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉल समितीने बुधवारी (दि. १३) सर्किट बेंच इमारत आणि समारंभ स्थळाची पाहणी करून सुरक्षेबद्दल अधिका-यांना सूचना दिल्या.
तब्बल ४२ वर्ष संघर्ष केल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. याच्या उद्घाटनाचा क्षण सर्वांना अनुभवता आला पाहिजे, यासाठी सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मेरी वेदर ग्राउंडवर समारंभाचे आयोजन केले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणाला आणि किती लोकांना प्रवेश द्यावा, याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, हा समारंभ सर्वांसाठी खुला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, उपस्थितांना शिष्टाचार पाळावे लागतील. समारंभ सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच आपल्या जागेवर पोहोचावे लागेल. कोणत्याही घोषणा देणे किंवा अनुचित प्रकार करता येणार नाही. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
समारंभाला अवघे तीन दिवस उरल्याने कामांचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रोटोकॉल समिती बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. पाच सदस्यीय समितीने सर्किट बेंच इमारतीच्या कामांची पाहणी केली. मेरी वेदर ग्राउंडवरील मंडपाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सुरक्षेबद्दल विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह पोलिस अधीक्षक योगेश कुमार उपस्थित होते.
या सूचना केल्या
प्रोटोकॉल समितीने सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, व्यासपीठावरील व्यक्तींच्या संख्येबाबत अधिका-यांना सूचना केल्या. उद्घाटन आणि कार्यक्रमस्थळी पुरेसा बंदोबस्त तैनात असावा. न्यायमूर्तींच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी व्हावी. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा असावी. वैद्यकीय पथक सज्ज असावे. समारंभस्थळी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असावी, अशा विविध सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काहींना पासचे वाटप
न्यायमूर्तीसह अन्य मान्यवरांच्या जवळ जाणाऱ्या व्यक्ती, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पास घेणे बंधनकारक केले आहे. सहा जिल्ह्यांतून निमंत्रित केलेले लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल. वकिलांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांना जिल्हा बार असोसिएशनने एक लिंक पाठवली असून, त्यावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनने दिली.