Kolhapur: बालसाहित्यिक श्याम कुरळे सरांचे काय झाले?, वर्ष झाले बेपत्ताच; शोध घेण्यात पोलिसांना अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:09 IST2025-04-24T13:04:29+5:302025-04-24T13:09:08+5:30
सीसीटीव्हीमध्ये दिसले, परंतु..

Kolhapur: बालसाहित्यिक श्याम कुरळे सरांचे काय झाले?, वर्ष झाले बेपत्ताच; शोध घेण्यात पोलिसांना अपयश
कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक, बालसाहित्यिक श्याम कुरळे हे घरातून निघून जाऊन सोमवारी (दि. २१) तब्बल एक वर्ष झाले. परंतु अजूनही ते सापडले नसून त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तब्येत बरी नसल्याने त्यांचा पत्ताही नीट सांगू शकत नव्हते. सर अजूनही कोठून तरी घरी येतील किंवा अमुक ठिकाणी ते आहेत, असा काहीतरी निरोप येईल म्हणून कुटुंबीय प्रतीक्षा करत आहेत.
मूळचे राधानगरी तालुक्यातील सोळांकुरचे असलेले कुरळे हे भोगावती हायस्कूलला मुख्याध्यापक होते. अनेक वर्षे ग्रामीण साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या कुरळे यांनी बालसाहित्यामध्येही भरीव कामगिरी केली होती. साने गुरुजी वसाहतीमध्ये आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळ ‘अक्षर’ बंगल्यामध्ये ते राहात होते. साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. विविध साहित्य संमेलने आणि साहित्यविषयक उपक्रमांना आवर्जून हजेरी लावण्याची त्यांना आवड होती. या पार्श्वभूमीवर वयाच्या ८१व्या वर्षाआधीपासून त्यांना स्मृतिभंशाचा त्रास होत होता. अशातच २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री पाऊण वाजता ते घरातून बाहेर पडले. ते परत घरी आलेच नाहीत.
दिवसभर शोधाशोध करून रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची वर्दी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी, नातेवाइकांनी आठवडाभर सर्वत्र त्यांचा शोध घेतला. विद्यार्थीप्रिय असलेल्या कुरळे सरांच्या शोधासाठी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला. कोल्हापूरच्या सर्व प्रमुख चौकात त्यांच्या छायाचित्रासह फलक लावण्यात आले. परंतु त्यामध्ये यश आले नाही. ते जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये गेले. खालूनच व्हिक्सच्या गोळ्या मागितल्या आणि त्या घेऊन ते गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. परंतु त्यापुढे मोठा फलक लावल्यामुळे ते पुढे नेमके कोठे गेले याचा पत्ता लागला नाही. वर्ष झाले तरी त्यांचा शोध घेण्यात जुना राजवाडा पोलिसांनाही अपयश आले आहे.
घरचे अजूनही प्रतीक्षेत
कुरळे सरांच्या घरी अजूनही त्यांच्या पत्नी, मुले, सुना त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. इतके तंत्रज्ञान पुढे गेलेले असले तरी घरातून निघून गेलेल्या माणसाला शोधण्यासाठी ते उपयुक्त ठरले नसल्याची खंत या सर्वांना आहे. सर्वांचे भले चिंतणाऱ्या हा माणूस कुठे असेल या चिंतेत वर्षभर कुटुंबीय आहेत.