आता र...!, उपसरपंचाने केले स्वत:विरोधातच मतदान; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:17 IST2025-08-13T13:16:53+5:302025-08-13T13:17:31+5:30

मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता

Khidrapur's female deputy sarpanch casts self rejection vote no confidence motion unanimously passed | आता र...!, उपसरपंचाने केले स्वत:विरोधातच मतदान; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

आता र...!, उपसरपंचाने केले स्वत:विरोधातच मतदान; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

दत्तवाड (जि. कोल्हापूर) : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील उपसरपंच पूजा पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंगळवारी १०-० अशा एकमताने मंजूर झाला. मात्र, मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे स्वत:विरोधात मतदान करणारी ही पहिलीच घटना घडली आहे.

खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण अकरा सदस्य असून आरक्षणाअभावी एक जागा रिक्त आहे. दरम्यान, उपसरपंच पूजा पाटील या मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती.

या सभेत गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार यांनी मतदानापूर्वी सर्व सदस्यांना मतदान प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. मात्र, मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. परिणामी, सर्वच्या सर्व दहा सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने हा ठराव एकमताने मंजूर झाला.

पाटील यांनी तातडीने फेर मतदान घेण्याची मागणी केली. पण, तहसीलदार हेळकर यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. एकदा गुप्त मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा मतदान घेता येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ठरावाच्या बाजूने दहा मते पडल्याचा निकाल जाहीर केला. यावेळी सरपंच सारिका कदम, ग्राम महसूल अधिकारी सूरज माने, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील उपस्थित होते. दरम्यान, उपसरपंच पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

Web Title: Khidrapur's female deputy sarpanch casts self rejection vote no confidence motion unanimously passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.