‘ओएनडीसी’कडून सामान्यांसाठी बाजारपेठ - चेतन नरके; केंद्र सरकारच्या उपक्रमात 'थायलंड'चाही सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:49 IST2024-11-28T12:48:29+5:302024-11-28T12:49:05+5:30
पोस्ट ऑफिसद्वारे सेवा

‘ओएनडीसी’कडून सामान्यांसाठी बाजारपेठ - चेतन नरके; केंद्र सरकारच्या उपक्रमात 'थायलंड'चाही सहभागी
कोल्हापूर : ऑनलाइन खरेदीचा वाढलेला ट्रेंड लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘ओएनडीसी’च्या (ओपन नेटवर्क डॉट डिजिटल कॉमर्स) माध्यमातून उत्पादकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. यामध्ये थायलंड देश संलग्न झाल्याने बाजारपेठेची व्याप्ती वाढली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी मार्जिनवर ‘ओएनडीसी’ ही सेवा देणार आहे. येथील शेतकरी, छोट्या उद्योजकांसाठी व्यासपीठ मिळाले असून उत्पादन सहज व चांगल्या दराने विक्री करू शकतात, अशी माहिती थायलंडचे वाणिज्य सल्लागार व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. नरके म्हणाले, सध्या खरेदीसाठी वेळ नसल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अनेक कंपन्या सक्रिय असल्या तरी त्यांचे मार्जिन ४५ टक्क्यांपर्यंत असते. त्याचा फटका उत्पादकांसह ग्राहकांना बसतो. ‘ओएनडीसी’ अवघ्या ३ ते ५ टक्के मार्जिनवर ग्राहकांना सेवा देणार आहे. थायलंड सरकारही यामध्ये सहयोगी झाल्याने इंडोनिशियासह आशिया खंडात भारतातील उत्पादने ऑनलाइन विक्री करता येणार आहेत. देशातील २३६ शहरात ही सेवा सुरू असून थायलंड, इंडोनिशिया देशांचा सहभाग वाढवल्याने त्याचा फायदा आपल्या उत्पादकांना होणार आहे.
कोल्हापूरला कसा होऊ शकतो फायदा
‘कोल्हापुरी गूळ’, ‘आजरा घनसाळ तांदूळ’, ‘काजू’, ‘नाचणीचे पदार्थ’, ‘कोल्हापुरी चप्पल’, ‘कोल्हापुरी साज’, ‘चांदीचे दागिने’, ‘कपडे’ ‘केळी’ याची थेट विक्री करता येणार आहे.
पोस्ट ऑफिसद्वारे सेवा
कुरिअर सेवेपेक्षा कमी पैशांत खरेदी केलेली वस्तू वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारत व थायलंड देशातील पोस्ट ऑफिसेस महत्त्वाचे दुवा आहेत. त्यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा झाल्याचे नरके यांनी सांगितले.