Kolhapur: 'करवीर पंचायत समिती' पतसंस्थेतील अपहाराचा आकडा गेला २४ कोटींवर, संशयित आरोपी मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:04 IST2025-10-09T12:03:17+5:302025-10-09T12:04:41+5:30
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग

Kolhapur: 'करवीर पंचायत समिती' पतसंस्थेतील अपहाराचा आकडा गेला २४ कोटींवर, संशयित आरोपी मोकाटच
कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील अपहाराचा आकडा २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी हा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. पतसंस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, कर्मचारी आणि लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली.
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने १३ कोटी २८ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून पतसंस्थेच्या कारभाराचे प्रभारी विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी फेर लेखापरीक्षण केले. त्यात फसवणुकीची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट झाले. ४४८ ठेवीदारांची २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लेखापरीक्षणात समोर आले.
संस्थेतील तत्कालीन पदाधिकारी, संचालक मंडळ आणि लेखापरीक्षक अशा ३४ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असून, उपअधीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करीत आहेत. याबाबत ५६ ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात दावे दाखल केले आहेत, अशी माहिती ठेवीदार फिर्यादी सुबराव रामचंद्र पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अपहाराचा तपशील असा
- रोख रक्कम अपहार : ४८ लाख ९९ हजार
- जिल्हा बँक लक्ष्मीपुरी शाखेत बनावट नोंदी करून : ४५ लाख
- जिल्हा बँक लक्ष्मीपुरी शाखेत धनादेश व्यवहारात फसवणूक : ६८ लाख
- नियमित कर्जात : १ कोटी ९० लाख
- आकस्मित कर्ज : ७ लाख ९९ हजार
- तारण कर्ज : ९ लाख ७१ हजार
- इर्शाद अल्लाबक्ष देसाई यांच्याशी संगनमत करून १५ लाख ७१ हजार
- पांडुरंग परीट यांनी उचल केलेली : १७ लाख ४५ हजार
- दामदुप्पट ठेव तारण कर्ज : २ लाख ८५ हजार
- दामदुप्पट ठेवी : ८४ लाख
- दामदुप्पट ठेवी जमा नसताना अदा : १७ लाख ८२ हजार
- कॉल ठेवी : १० कोटी ५ लाख
- कॉलठेवी जमा नसताना अदा : ८ कोटी
- कॉलठेवी जमा नसताना अदा : ९२ लाख
- शुभम उल्हास लोखंडे : ३० लाख ८७ हजार
- वीर हनुमान दूध संस्था कुरुकली : ५ लाख
- व्यवस्थापक पांडुरंग आण्णाप्पा परीट यांच्याकडून जमा नसलेली ठेव उचल : २३ लाख ६४ हजार