Kolhapur Crime: पोलिसांच्या ताब्यातून पळाला, कंक दांपत्याचा खून केला; चोरीतील मोबाईलमुळे लागला सुगावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:24 IST2025-11-05T12:23:06+5:302025-11-05T12:24:18+5:30
कंक दांपत्याचा खून करून पळाल्यानंतर आरोपीकडून कोकणात घरफोड्या

Kolhapur Crime: पोलिसांच्या ताब्यातून पळाला, कंक दांपत्याचा खून केला; चोरीतील मोबाईलमुळे लागला सुगावा
कोल्हापूर : दुचाकी चोरीच्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय ४८, शिरगाव ता शाहूवाडी) याने मुख्यालयातून पळ काढून शाहूवाडी तालुक्यातील गोळीवणे येथे कंक दांपत्याचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
१६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोघांचा खून करून जाताना त्याने कडवे (ता. शाहूवाडी) येथून दुचाकी चोरली. तसेच कोकणात जाऊन दोन घरफोड्या केल्याचेही समोर आले आहे. पोलिस मुख्यालयातून पोलिसांच्या ताब्यातून तो पळाला नसता तर कदाचित पुढचे गुन्हे घडले नसते, अशी चर्चा आता सुरू आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला विजय गुरव हा सराईत गुन्हेगार आहे. खून आणि पोकसोच्या गुन्ह्यात तो सांगलीतील कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्षभरापूर्वीच त्याची सुटका झाली. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याला पोलिस मुख्यालयात ठेवले होते. सात ऑक्टोबर रोजी रात्री आकाराच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून तो मुख्यालयातून पळून गेला होता.
त्यानंतर आठवडाभर तो शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात फिरत होता. गोळीवणे येथील कंक दाम्पत्याचे घर त्याला लपण्यासाठी योग्य वाटले. तिथेच आश्रय मिळावा आणि जेवणाची सोय व्हावी, असा आग्रह त्याने कंक दांपत्याकडे धरला होता. मात्र, निनू कंक यांनी याला विरोध केला. याच रागातून गुरव याने निनू कंक यांना बोलण्यात गुंतवून घरापासून काही अंतर दूर नेले. तिथे डोक्यात काठी आणि दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर घराकडे येऊन रुक्मिणीबाई यांचा खून केला.
वृद्ध दांपत्याचा खून करून पाळल्यानंतर त्याने कडवे गावातून दुचाकी चोरली. त्याच दुचाकीवरून तो कोकणात गेला. १९ ऑक्टोबर रोजी कंक दांपत्याचे मृतदेह आढळल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली. मात्र, वन विभागाने ही शक्यता फेटाळताच पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकांनी गोळीवणे परिसरातील एका फार्महाऊस मधील सीसीटीव्ही फुटेज आणि कडवे येथील एका फुटेजद्वारे गुन्हेगाराचा शोध घेतला.
अन्यथा दुहेरी खून पचला असता
हल्लेखोर विजय गुरव यांच्याकडे चोरीतील मोबाईल होता. त्यावरून पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. तातडीने रत्नागिरी जिल्ह्यातून त्याला अटक केली. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे सराईत गुन्हेगार विजय गुरव याला अटक झाली. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समजून या गुन्ह्याचा तपास पुढे झालाच नसता आणि गुरव याने केलेले दोन खून पचले असते.
यांनी केला तपास
पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, तसेच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार हिंदुराव केसरे, राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर आणि अमित सर्जे यांच्या पथकाने तपास केला.
कोकणात दोन घरफोड्या
कंक दाम्पत्याचा खून करून पळाल्यानंतर विजय गुरव याने रत्नागिरी जिल्ह्यात दोन घरफोड्या केल्या. तो आणखी काही गुन्हे करण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वीच त्याला जेरबंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हे करण्याच्या पद्धतीवरूनच तो पोलिसांच्या हाती लागला.
खुनानंतर जंगली श्वापदानी तोडले लचके
१९ तारखेला झालेले खून १९ तारखेला उघडकीस आले. दोन्ही मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसत होते. त्यामुळे जंगली शापदांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, खुनानंतर जंगली प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.