Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:57 IST2023-06-22T11:56:42+5:302023-06-22T11:57:12+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा

Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट
सोळांकूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा असल्याने व पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट दिसत आहे. या धरणावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी पिके वाळली आहेत तर काहींनी उस पिकाची कापणी सुरू केली आहे. अत्यंत भयानक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
आज धरणामध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील ५०० क्युसेस पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी कमी असल्याने विद्युत जनित्र केंद बंद असून डाव्या व उजव्या कालव्यातील पाणी प्रवाह बंद करण्यात आला आहे. ऊस पिके वाळली असून भात पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.
याचवर्षीप्रमाणे १३ जून २००७ रोजी केवळ असाच मृतसाठा शिल्लक राहिला होता. पाऊस वेळेवर लागल्याने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. २० जून २०१९ रोजी २.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता . मात्र योग्य नियोजन व पावसाची सुरुवात वेळेत झाल्याने कोणतीही हानी झाली नाही.
यावर्षी पाऊस लांबल्याने धरणावर अवलंबून असणारी पिके वाळू लागली आहेत. पाणी वेळेत न मिळाल्याने काही पिके वाळली आहेत. ती पिके शेतकरी कापून जनावरांना घालू लागले आहेत.
मुख्य भिंतीच्या गळतीचे काम अपूर्णच..
धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या गळतीला वाचा फोडली होती .यावर्षी काम करण्याच्या उद्देशाने पाठवलेला प्रस्ताव मंजूर न झाल्याने गळती काम अपूर्णच राहणार असे दिसत आहे. यावर्षी गळतीचे काम करण्याची संधी उपलब्ध असताना केवळ निधीअभावी रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याचे पाणी जपून वापरावे म्हणून गावांमध्ये दवंडी देत आहेत.