बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:27+5:302020-12-05T04:57:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संकेश्वर (जि. बेळगाव) : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जखमी झालेले नेर्ली (ता. हुक्केरी) येथील ...

Jawan of Belgaum district martyred in Jammu and Kashmir | बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

लोकमत न्यूज नेटवर्क

संकेश्वर (जि. बेळगाव) : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जखमी झालेले नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवारी वीरमरण प्राप्त झाले. चेतन यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी नेर्ली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मंगळवारी (दि. १) रात्री बारामुल्ला (उरी) सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत चेतन हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सैनिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

चेतन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हेब्बाळ येथील डी. एल. खोत ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले होते. २०१४ मध्ये नाशिक येथे सैन्यदलात ते भरती झाले. दोन महिन्यांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. नेर्लीमध्ये चेतन यांची शेती असून, वर्षभरापूर्वी बसवान मंदिर रोडलगत त्यांनी नवीन घर बांधले आहे. चेतन हे लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. चेतन व त्यांचा लहान भाऊ दयानंद या दोघांचे पालनपोषण त्यांच्या आत्या शोभा बाबू गुंडाळी (रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) यांनी केले आहे. चेतन शहीद झाल्याने नेर्ली गावात शोककळा पसरली आहे. आज चेतन यांच्या पार्थिवावर गावातील कावेरी हायस्कूलजवळील पाटील शेतवडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

-----------------------------

कुटुंबीय देशसेवेत

चेतन यांचे वडील बसवराज हेदखील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. लहानपणापासून आई-वडिलांच्या मायेला पोरके झालेले चेतन हे सैन्यदलात, तर त्यांचा लहान भाऊ दयानंद हाही नौदलात आहे.

-----------------------------

फोटो: ०३ चेतन पाटील

Web Title: Jawan of Belgaum district martyred in Jammu and Kashmir