Kolhapur News: आजऱ्यातील जाधेवाडीकर ग्रामस्थ-क्रेशर कामगारांमध्ये धुमचक्री, चारजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:25 IST2023-01-04T18:24:50+5:302023-01-04T18:25:26+5:30
आजरा पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.

Kolhapur News: आजऱ्यातील जाधेवाडीकर ग्रामस्थ-क्रेशर कामगारांमध्ये धुमचक्री, चारजण जखमी
रवींद्र येसादे
भादवण : आजरा तालुक्यातील जाधेवाडी गावाजवळील क्रेशरचे काम बंद करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांमध्ये अन् क्रेशर कामगारांमध्ये धुमचक्री उडाली. यात चार ग्रामस्थ जखमी झाले. याबाबत आजरा पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.
याबाबत माहिती अशी की, जाधेवाडी जवळ राजेंद्रसिंह भांबो इन्फा प्रा. लि. कंपनीचा क्रेशरचे काम सुरु आहे. क्रेशर बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थ गेली दोन महिने प्रयत्न करीत आहेत. मात्र क्रेशरचे काम सुरुच आहे. यातच आज, बुधवारी सकाळच्या सुमारास खडी फोडण्यासाठी कंपनीने सुरुंग लावला. याचा मोठा स्फोट झाल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली.
काही ग्रामस्थ खडी क्रेशर बंद करा असे सांगण्यासाठी घटनास्थळी गेले. यावेळी क्रेशर कामगार अन् ग्रामस्थांमध्ये प्रंचड वादावादी व हाणामारी झाली. यात उपसरपंच रघुनाथ सावंत, ईश्वर निंगाप्पा सुतार, विश्वास मारुती करडे हे जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे, सहाय्यक फौजदार बी. एस कोचरगी हे राज्य रिझर्व्ह पोलिस दलाची तुकडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना पाहताच दोन्ही बाजूचा तणाव निवळला. उशिरापर्यंत दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.