होतं स्वप्न, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात; मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी केले मन मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:16 IST2025-06-06T18:15:00+5:302025-06-06T18:16:41+5:30

'पोटासाठी रस्त्यावरचा कचरा आणि भंगार उचलला'

It was a dream, I sat down with true faith Mumbai's garbage collector Sushila Sable made her heart free | होतं स्वप्न, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात; मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी केले मन मोकळे

होतं स्वप्न, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात; मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी केले मन मोकळे

कोल्हापूर : ‘होतं स्वप्न ते आयुष्य जगण्याचं, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात, कोपन हेगन ते चायना, साउथ आफ्रिकेला राहून, जाउन आले मी, त्यात थायलंड-ब्राझीलही होतं’ या गाण्याच्या ओळी सादर करून मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी कचरा वेचकांचे मन सर्वांसमोर मोकळं केलं.

येथील शाहू स्मारक भवनात गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अवनि संस्था आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा, पर्यावरण संरक्षणाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात साबळे यांचा सन्मान करण्यात आला. ‘कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणामधील योगदान’ या विषयावर त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, १९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा मराठवाड्यातून मायसोबत मुंबईला गेले. मिळेल त्या जागेवर झोपडी बांधून राहिलो. पोटासाठी रस्त्यावरचा कचरा आणि भंगार उचलला. आज कचरा वेचकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करतेय तरी हे काम थांबवलेले नाही, कारण हे पर्यावरण वाचवण्याचे काम आहे, हे आता मला समजले आहे.

थंडी, ऊन, पावसात काम करणाऱ्या या कचरा वेचकांना किमान ओळखपत्र द्या, ग्लोव्हज आणि बूट द्या. प्लॅस्टिकचा कचऱ्यावर पूर्णपणे बंदी घातली तर या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आधी सोडवा. अवनि संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी त्यांची ओळख करून दिली.

महिलांनी वाजवल्या टाळ्या

या कार्यक्रमात साबळे म्हणाल्या, कोल्हापूर मला खूप आवडले. या कार्यक्रमाची संकल्पनाही आवडली. कचरा वेचक महिलांना कामातून तासभर वेळ काढून त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे गरजेचे आहे. छान साडी नेसून, नटून-थटून स्वत:साठी वेळ काढला, याबद्दल त्यांचे आणि संस्थेचे अभिनंदन असे म्हणताच उपस्थित कचरा वेचकांनीही टाळ्या वाजवल्या.

Web Title: It was a dream, I sat down with true faith Mumbai's garbage collector Sushila Sable made her heart free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.