राजकीय वादात अभिनेत्रीची नाव जोडणे शोभत नाही, चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:44 IST2024-12-30T13:43:58+5:302024-12-30T13:44:34+5:30
बीड प्रकरणी मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाहीत

राजकीय वादात अभिनेत्रीची नाव जोडणे शोभत नाही, चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना सुनावले खडेबोल
कोल्हापूर : एखाद्या राजकीय वादात अभिनेत्रीचे नाव जोडणे भाजपचे आमदार सुरेश धस यांना शोभत नाही, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धस यांना रविवारी खडेबोल सुनावले.
मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री पाटील प्रथमच कोल्हापुरात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केेले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत, अशा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला. याबाबत मंत्री पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसांच्या अधिवेशनात चार ते साडेचार तासांचा वेळ चर्चेसाठी दिला. सर्वांनी आपल्या भावना मांडल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणी दोषींना सोडणार नसून कठोर पावले उचलली जाणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात फडणवीस ठरवतील आणि त्यांनी कधीही डावा उजवा असे केलेले नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचाही समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. या प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले.
मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची काटेकोरपणे काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव जोडणे सुरेश धस यांना शोभत नाही. धस यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहे. त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल, असे बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनीदेखील काल पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केल्या आहेत. धस यांना विनंती करेन की, पक्षाचा आमदार असूनदेखील तुम्ही असे काम करू नये.