अजितदादांना कारचे वावडे.. कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर काढले वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:11 IST2025-03-28T12:09:01+5:302025-03-28T12:11:51+5:30
कोल्हापूर : गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापुरात येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ...

अजितदादांना कारचे वावडे.. कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर काढले वाभाडे
कोल्हापूर : गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापुरात येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ती डीव्ही कार नव्हती. यावरून पवार चांगलेच भडकले व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दोन कार घेण्याचे फर्मान सोडले.. ही बातमी सोशल मीडियावर फिरताच कोल्हापूरकरांनी कमेंटचा पाऊसच पाडला.
हा कारचा दोष की कोल्हापुरातल्या रस्त्यांचा, बघा कोल्हापूरकरांच्या सहनशक्तीला सलाम केला पाहिजे, पूर्वीचे आमदार, खासदार एसटी बसने फिरायचे, ज्याला काम करायचे आहे, त्याला रिक्षादेखील चालते.. अशा वेगवेगळ्या कमेंट व्हायरल होत राहिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इनोव्हा कार आवडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उतरताच ते जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांना म्हणाले, “नवीन गाड्या घ्या कलेक्टर.” यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच गाड्यांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. यावर पवार म्हणाले, “आत्ताच्या आत्ता मला प्रस्ताव द्या, मी सही करतो. तातडीने दोन गाड्या विकत घ्या,” असा आदेशच त्यांनी दिला. प्रशासनाकडील पाचपैकी तीन गाड्या निर्लेखित केल्या गेल्या. उरलेल्या दोनपैकी एक गाडी पवार यांना दिली होती, जी त्यांना आवडली नाही.
ही बातमी दिवसभर समाज माध्यमांवर फिरत राहिली. कोल्हापूरकर मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी त्रस्त झाले आहेत. त्यांना किती राग यावा? दादा तापट असले तरी शहरातील नागरिक किती संयमी आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. लोकप्रतिनिधींनी एसटी बसने प्रवास करावा म्हणजे नागरिकांचे काय हाल होतात हे कळेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात होत्या.