चंद्रपूरच्या बुकी मालकाची आलिशान मोटार प्रशांत कोरटकरच्या दिमतीला, फरार काळात तीन राज्यांत वावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:11 IST2025-03-29T12:11:35+5:302025-03-29T12:11:54+5:30
फरार काळात तीन राज्यांत वावर, बुकी मालकासह चार जणांसोबत संपर्क

चंद्रपूरच्या बुकी मालकाची आलिशान मोटार प्रशांत कोरटकरच्या दिमतीला, फरार काळात तीन राज्यांत वावर
कोल्हापूर : चंद्रपूर येथील बुकी मालक धीरज चौधरीची आलिशान मोटार संशयित प्रशांत कोरटकर अस्तित्व लपवण्यासाठी वापरत होता. फरार काळात तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांत असून बुकी मालकासह अन्य चार जणांसोबत संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचे अन्य कोणत्या गुन्हेगारी संबंध आहेत का, कोणत्या संघटना, व्यक्तींचा पाठिंबा आहे का, हॉटेलचे बिल, फिरण्यासाठी किती मोटारी वापरल्या, त्याला पैसे कोणी दिले, याचा तपास करण्यासाठी कोरटकरला पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी शुक्रवारी पोलिसांनी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याबद्दल कोरटकरला अटक केली. त्याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी चौथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एस. एस. तट यांनी त्याला आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला शुक्रवारी सकाळीच पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ठेवले. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुनावणीला सुरुवात झाली. कोरटकरला काही सांगायचे आहे का, असे न्यायाधीशांनी प्रथम विचारले. त्या वेळी त्याचे उत्तर नाही, असे आले. त्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तपासात एक आलिशान मोटार जप्त केल्याचे सांगितले. त्याने फरार काळात तीन राज्यांत प्रवास केला आहे. त्यामुळे वेगवेगळी वाहने वापरली असल्याची शक्यता आहे.
मात्र तपासात तो परिपूर्ण माहिती देत नाही. केवळ ज्या हॉटेलमध्ये राहिला आहे, त्याची माहिती दिली. त्याने संबधित मालकांचे व्हॉट्सॲपचे क्रमांक दिले आहेत. त्याच्यावर हजर राहण्याचा नोटिसा पाठविल्या आहेत. त्याने सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी त्याची चौकशी करण्यासाठी दोघांनाही समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे. तो राहिलेल्या हॉटेलमध्ये कोणती ओळखपत्रे दिली आहेत. त्याच्याकडे ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था नसल्याने पैसे कोणी दिले, याचा तपास करण्यासाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी पोलिसांनी दिलेली कारणे पोलिस कोठडी मिळण्यासाठी योग्य असून कोठडी वाढविली नसल्यास पोलिसांना योग्य तपास करणे शक्य होणार नसल्याचे सांगितले.
सोबत कोण होते, याची माहिती लपवितो
कोरटकरने इंद्रजित सावंत यांना फोन केल्यानंतर त्याच्या सोबत आणखी कोण होते, याची माहिती सांगत नाही. २२ फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२३ आणि १८ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत तो कोठे राहत होता. त्याला आर्थिक मदत कोणी केली. तो पत्रकारितेचे काम करत असल्यामुळे त्याने पोलिस कोठडीत स्वतःविरुद्ध पुरावा होणार नाही, याची काळजी घेत आहे. तो तपासात अपेक्षित असलेली उत्तरे देत नसून असहकार्य करत आहे, त्यामुळे पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयासमोर केली.
कोरटकरचे आश्रयदाते
फरार काळात संशयित कोरटरकरने प्रशिक पडवेकर (रा. नागपूर), धीरज चौधरी, रा. चंद्रपूर), हिफाजतअली, राजेंद्र जोशी (रा. इंदूर), साईराज पेंटकर ( रा. करीमनगर) यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. कोरटकर गुन्ह्यातील संशयित असूनही त्याला आश्रय दिला, अशी माहिती सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयासमोर दिली.
धीरज चौधरीची मोटार जप्त
महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमा भागातून शुक्रवारी रात्री धीरज चौधरी याची मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली. पांढऱ्या रंगाची एसयूव्ही ७०० (एमएच ३४ सीडी ७७२०) या नंबरची मोटार जप्त केली. अजूनही चार मोटारींचा वापर कोरटकरने केला आहे. त्या मोटारी जप्त करायच्या असल्याचे तपास अधिकारी संतोष गळवे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा आवाज बंद करायचा आहे का ?
न्यायालयात सुमारे १ तास युक्तिवाद झाला. संशयित कोरटकर याचे वकील सौरभ घाग आणि सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सरोदे यांच्या युक्तिवादावर घाग यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने दोघांत खडाजंगी झाली. युक्तिवाद सुरू असताना घाग यांनी व्हीसीवर हजर असलेल्या सरोदे यांचा आवाज म्यूट करावा, असे सांगितले. त्या वेळी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बंद करणार काय? असा प्रतिप्रश्न सरोदे यांनी उपस्थित केला. त्यावर घाग यांनी तुम्ही माध्यमांसमोर नसून न्यायालयात आहात, असे सांगितले.