सभासदांच्या मुलांना नोकरीची संधी देणारी संस्था

By Admin | Updated: January 23, 2015 23:35 IST2015-01-23T21:27:08+5:302015-01-23T23:35:42+5:30

जि. प. कर्मचारी सोसायटी : उद्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Institution giving job opportunities to the children of the children | सभासदांच्या मुलांना नोकरीची संधी देणारी संस्था

सभासदांच्या मुलांना नोकरीची संधी देणारी संस्था

कोल्हापूर : संस्थेत नोकरभरती करताना सभासदांच्या घरी भरतीची जाहिरात पाठवून, त्यातून गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. त्याचबरोबर काटकसरीचा कारभार करीत अडीच कोटींचा निव्वळ नफा कमवीत सहकारातील ‘आदर्श संस्था’ म्हणून ती पुढे येत आहे. सन १९६६ मध्ये स्थापन झालेली ही संस्था कर्मचाऱ्यांचा आधारवड ठरली होती; पण सहा-सात वर्षांपूर्वी ती राजकीय उधळपट्टीने आर्थिक अरिष्टात सापडली होती. विद्यमान अध्यक्ष एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली सहा वर्षे संचालकांनी संस्थेला आर्थिक अरिष्टातून तर बाहेर काढलेच; पण त्याबरोबर सभासदांना आधार देत संस्था कशी बळकट करता येते, याचे उत्तम उदाहरण सहकारासमोर ठेवले आहे. संस्थेच्या ठेवींत तब्बल २४ कोटी ६३ लाखांची वाढ झाली. सभासद कर्जे वाढलीच; पण त्याबरोबर कर्जांचे दरही दोन टक्क्यांनी कमी करण्याची किमयाही संचालकांनी केली. जिल्हा बॅँकेकडून सुमारे बारा कोटी १२.५ टक्के व्याजदराने सोसायटीने घेतले व सभासदांना मात्र १२ टक्क्याने वाटप केले, असे असतानाही सोसायटीचा नफा २ कोटी ४० लाख रुपये आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकांनी नोकरभरती करताना सभासदांच्या घरी जाहिरात पाठवून पात्र उमेदवारांचे अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊनच निवड केली. या संस्थेने इमारत उभी केली आहे. तिचे उद्घाटन रविवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते, खासदार धनंजय महाडिक, खा. राजू शेट्टी, विमल पाटील, आदींच्या उपस्थितीत होत आहे.

सहा वर्षांपूर्वी संस्थेच्या तीन हजार सभासदांनी ज्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी सोपविली, तो विश्वास जोपासत संस्थेला अव्वल स्थानी नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुकाणू समितीचे मार्गदर्शन लाभलेच; पण त्याबरोबर सभासदांनी केलेले सहकार्य विसरता येणार नाही.  --- एम. आर. पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी

Web Title: Institution giving job opportunities to the children of the children