कोल्हापूर : गुन्ह्यात महत्त्वाचा ठरणारा मोबाइलमधील डाटा नष्ट केल्याप्रकरणी संशयित प्रशांत कोरटकरवर याच्यावर पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविले आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली. पुरावा नष्ट करण्याचे कलम २४१ (बीएनएस) वाढविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे मागणी पत्रांची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढवावे, या मागणीचे निवेदन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना दिले होते. या अर्जाची दखल घेऊन पूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये संबधित कलम वाढविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याच्यावर पुरावा नष्ट करण्याचे कलम २४१ (बीएनएस) वाढवावे, असा युक्तिवाद सावंत यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन सुनावणी वेळी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे की, कोरटकरने दोन समाजात वाद होईल, असे वक्तव्य केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून त्याने नागपूर सायबर शाखेकडे आपला मोबाईल आणि सीमकार्ड जमा केले. मात्र, त्यातील डाटा नष्ट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. यावेळी दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, ॲड. हेमा काटकर, ॲड. पल्लवी थोरात, ॲड. योगेश सावंत, आदी उपस्थित होते.
Kolhapur- इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरटकरवर आणखी एक कलम वाढवले
By सचिन यादव | Updated: March 20, 2025 19:19 IST