Kolhapur Politics: घटक पक्षाविना कागलमध्ये इंडिया आघाडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:28 IST2025-11-10T17:27:07+5:302025-11-10T17:28:26+5:30
Local Body Election: एकसंधतेचा निर्धार, पण..

Kolhapur Politics: घटक पक्षाविना कागलमध्ये इंडिया आघाडीची बैठक
जे. एस. शेख
कागल : पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कागल येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली. कागल तालुक्यातील सर्व निवडणुकांना इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणे सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मात्र, या बैठकीला आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.
काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते. ईगल प्रभावळकर यांच्या घरी ही बैठक घेण्यात आली. यावेळी काॅ. शिवाजीराव मगदूम, शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटगे, उद्धवसेनेचे दिलीप पाटील, जयसिंग टिकले, शहरप्रमुख अजित मोडेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे दयानंद पाटील, सागर कोंडेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एकसंधतेचा निर्धार, पण..
कागल तालुक्यातील निवडणुकांना इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणे सामोरे जाण्याचा निर्धार केला. शरदचंद्र पवार पक्षाचे कोणीही उपस्थित नव्हते.
म्हणून ‘ते’ बैठकीला गैरहजर
- जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोणी पदाधिकारी उपस्थित नसल्याने अचानक ठरलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीलाही त्यांचे कोणी हजर राहू शकले नाहीत.
- तालुक्यात समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष सक्रिय आहे. कागल व मुरगुड नगरपालिका निवडणुकीत त्यांची माजी खासदार संजय मंडलिक गटाशी युती होत असल्याचे संकेत मिळत आहेत.