Kolhapur: निरीक्षकच नाहीत, बनावट औषधांच्या प्रमाणात वाढ; राज्यात भरती निघाली, तोवर…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:36 IST2025-08-16T16:36:02+5:302025-08-16T16:36:32+5:30
आतापर्यंत किती कारवाया झाल्या.. वाचा

संग्रहित छाया
कोल्हापूर : पावसाळ्यात अनेक साथरोग पसरत आहेत, त्यातच बनावट औषधांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यांत अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची वानवा आहे. परिणामी, बनावट, कालबाह्य औषधे, साठेबाजी, नियमबाह्य व्यवहार वाढले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३८ लाख ७६ हजार आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात औषध निरीक्षक नाहीत. मंजूर सर्व ७ जागा रिक्त आहेत. २ सहायक आयुक्त आणि ६ औषधे निरीक्षकांची मंजूर पदे असताना केवळ एका सहायक आयुक्तावर सर्व कारभार चालला आहे.
जिल्ह्यात साडेपाच हजार मेडिकल दुकाने; ८ हजार दवाखाने
जिल्ह्यात नोंदणीकृत साडेपाच हजार मेडिकल दुकाने आहेत आणि मुंबई नर्सिंग ॲक्टनुसार जिल्ह्यात २१५ रुग्णालये आणि २६०० क्लिनिक आहेत. शहरात ही संख्या पाच हजारांहून अधिक आहे. अशी किरकोळ आणि घाऊक अशी एकूण सुमारे ८ हजार दुकानांच्या दैनंदिन तपासणीचे काम अन्न व औषध प्रशासनाकडे आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे काम नेमके काय?
दैनंदिन तपासणी, नव्या दुकानांसाठी तपासणी, रक्तपेढ्यांवर नियंत्रण, रक्त साठ्याच्या ठिकाणांची दैनंदिन तपासणी, सौंदर्यप्रसाधने, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी औषधे निर्मिती उद्योगांवर नजर ठेवणे, शिवाय बनावट व दर्जाहीन औषधे आढळली तर गुन्हे दाखल करून न्यायालयामध्ये संबंधितांना साक्षीसाठी हजर राहाणे इतका कार्यभार केवळ प्रभारीच सांभाळत आहेत.
जिल्ह्यात औषध तपासणीची यंत्रणा तोकडी
जिल्ह्यात औषध तपासणीची यंत्रणा तोकडीच आहे. त्यामुळे प्रभावीपणे कारवाई करण्यात मर्यादा आहेत.
बनावट औषध विक्रीचे प्रमाण वाढले
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे. तरीही तशी औषध विक्री करण्याचे प्रयत्न औषध दुकानदार करतात. बनवट औषध विक्रीचेही प्रमाण वाढले आहे. यंत्रणा नसल्याने यावर अंकुश नाही.
राज्यात १०९ पदांची भरती निघाली, तोवर…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या राज्यातील १०९ जागा भरण्यात येत आहे. तोपर्यंत मात्र या कामाचा बोजा अतिरिक्त कर्मचाऱ्यांवरच आहे.
किती कारवाया
वर्ष-कारवाई
२०२१ - २५
२०२२ - १९
२०२३ - ७१
२०२४ - ६४
२०२५ - ४३
विविध कामासाठी मोठे मनुष्यबळ लागते; परंतु सध्या इतका मोठा कार्यभार मोजके अधिकारीच सांभाळत आहेत. - महेश कवठिकवार, सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग