कोल्हापुरातील उद्योजकाच्या निवासस्थान, कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, दसऱ्याला घेतली आलिशान गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:45 IST2025-10-09T11:43:39+5:302025-10-09T11:45:06+5:30
कोल्हापूर, गोव्यासह उत्तर प्रदेशात एकाचवेळी छापे :

कोल्हापुरातील उद्योजकाच्या निवासस्थान, कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, दसऱ्याला घेतली आलिशान गाडी
कोल्हापूर : गोवा येथील प्रसिद्ध स्टील उद्योग समूहाच्या संचालकांच्या गोवा, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील कारखाना, निवासस्थान व कार्यालय आदी १० ते १२ ठिकाणी बुधवारी सकाळी गोवा येथील आयकर विभागाने छापे मारल्याचे समजते. महाराष्ट्रात कोल्हापुरात पाच ठिकाणी तर उत्तर प्रदेशमध्ये सहा ठिकाणी छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईने उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
गोवा येथे कोल्हापूरस्थित एका उद्योजकाचा स्टील उत्पादनाचा कारखाना आहे. गोवा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी स्टीलचा पुरवठा केला जातो. गोवा येथील आयकर विभागाने बुधवारी सकाळी तीनही राज्यांतील संबंधित कंपनीच्या कारखाने व संचालकांच्या निवासस्थानी छापे मारले. गोवा येथील कारखान्यावर गोवा आयकर विभागाने तर कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील निवासस्थान, कागल एमआयडीसी येथील कारखाना, ऑफिस अशा पाच ठिकाणी व उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथील संचालकाच्या घर व कार्यालयाचा समावेश आहे.
या कारवाईत आयकर विभागाने संबंधित उद्योगसमूहाच्या गेल्या सहा वर्षांतील अकाउंट्सची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. संबंधित उद्योग समूहाने घर, जमीन, शेअर्स तसेच सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने आयकर विभागाने आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी उद्योग समूहातील कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे समजते.
या उद्योग समूहाचा कोल्हापुरातही कागल एमआयडीसीमध्ये स्टील उत्पादन करण्याचा कारखाना आहे. कोल्हापुरातील आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी सात वाजता न्यू पॅलेस परिसरातील उद्योग समूहाच्या संचालकाच्या निवासस्थान व कागल एमआयडीसी येथील कारखाना व ऑफिसवर छापे मारले. या कारवाईत कोल्हापूर आयकर विभागातील पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी झाले.
स्थानिक आयकर विभागाचा समावेश
गोवा येथील आयकर विभागाची ही मुख्य कारवाई आहे. पण, कोल्हापूर येथे कोल्हापूर आयकर विभागाने कारवाई केली आहे. या सर्व ठिकाणी आयकर विभागाने हिशोबाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कागदपत्रे जप्त
आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घर तसेच कागल येथील कारखान्यामधील कागदपत्रे जप्त केली आहेत. संचालकांची वेगवेगळ्या बँकांमध्ये असणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. काही बँकांची खाती तत्काळ गोठविण्याचे आदेश आयकर विभागाने दिल्याचे समजते.
दसऱ्याला घेतली आलिशान गाडी
दसऱ्याच्या मुहूर्तावर या उद्योगसमूहाच्या संचालकाने अंदाजे दीड ते पावणेदोन कोटी रुपये किमतीची आलिशान गाडी खरेदी केली असल्याचे समजते. या वाहनाला पसंती क्रमांक मिळाला नसल्याने ही गाडी निवासस्थानी लावण्यात आली होती. या वाहनाबाबतचा तपशील आयकर अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत असल्याचे समजते.