निर्माल्यापासून बनवले धूप, साबण, स्क्रबर, रंग; कोल्हापुरातील अवनितर्फे कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:27 IST2025-09-05T18:26:11+5:302025-09-05T18:27:38+5:30
पर्यावरणपूरक वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दाखवून दिले

निर्माल्यापासून बनवले धूप, साबण, स्क्रबर, रंग; कोल्हापुरातील अवनितर्फे कार्यशाळा
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या निर्माल्यातील नारळाच्या शेंडीपासून भांडी घासण्यासाठी स्क्रबर, झेंडूच्या फुलांपासून नैसर्गिक रंग, आयुर्वेदिक साबण, कडुलिंबाची पाने वाळवून डिंक मिसळून औषधी गोळ्या, केळीच्या देठापासून धान्य संरक्षणासाठी साहित्य, गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद व देशी गुलाबाची रोपे, दुर्वाचा रस औषधी गुणधर्मांसाठी वापरणे अशा अनेक उपयोगी वस्तू बनविण्याची कार्यशाळा अवनि संस्थेतर्फे घेण्यात आली.
वाशी येथील कस्तुरबा गांधी शेती प्रकल्प कार्यालयात गणेश विसर्जनानंतर उरलेल्या निर्माल्यापासून उपयुक्त व पर्यावरणपूरक वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दाखवून दिले.
यात नंदवाळ, कांडगाव, वाशी येथील शेतकरी पुरुष व महिला, कचरावेचक परिसर भगिनी, अवनि बालगृहातील मुली तसेच संस्थेतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, केदार पाटील, माया जोगडे व पुष्पा शिंदे यांनी संयोजन केले.