महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:26 IST2025-06-20T16:25:36+5:302025-06-20T16:26:12+5:30

चारही नेत्यांची कामकाजाची पद्धत, स्वभाव पूर्णपणे भिन्न

In the upcoming elections the responsibility lies with Mahayuti Minister Prakash Abitkar, Hasan Mushrif, Chandrakant Patil, and MLA Vinay Kore in Kolhapur district | महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट

महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट

कोल्हापूर : विधानसभेला घवघवीत यश मिळवणाऱ्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर आता नवी जबाबदारी पडली आहे. येणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीची सत्ता यावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे यांना जोडण्या घालाव्या लागणार आहेत. महायुतीची मदार या चार नेत्यांवर राहणार आहे.

या चारही नेत्यांची कामकाजाची पद्धत, स्वभाव पूर्णपणे भिन्न आहे. मुश्रीफ, कोरे विरुद्ध पाटील, आबिटकर असे राजकारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असताना रंगले होते. अजित पवार महायुतीत आल्यापासून मुश्रीफ हे महायुतीचे नेते झाल्याने आता राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत.

एकाच ठिकाणी महायुतीचेच अधिकाधिक उमेदवार इच्छुक असेल त्या ठिकाणी मात्र या नेत्यांची कसोटी लागणार आहे. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांची आणि राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, शिवाजी पाटील यांची त्या त्या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका असेल.

हसन मुश्रीफ
निवडणूक जिंकण्यासाठी कधी, कशा जोडण्या घालायचे हे मंत्री मुश्रीफ यांना चांगले अवगत आहे. महायुतीला दिशा देण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील. अडचणीच्या काळात नेमका मार्ग काढण्याची त्यांची हातोटी आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्ह्यातील एकखांबी तंबू आहेत. त्यामुळे झटपट निर्णय घेण्यात ते माहिर आहेत.

चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील हे जरी पुण्यातून निवडून आले असले तरी अजूनही कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा सल्ला घेतला जातो. कोल्हापुरात तर ते भाजपच्यावतीने निर्णायक भूमिका घेतात.

प्रकाश आबिटकर
शिंदेसेनेची जबाबदारी मुख्यत: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर राहील. त्यांच्यासह शिंदेसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात असून, राजेंद्र पाटील यड्रावकरही शिंदेसेनेसोबतच आहेत. या सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांना झटावे लागेल.

विनय कोरे
चार तालुक्यांचे राजकारण करतानाही विनय कोरे यांनी जिल्हास्तरीय अनेक संस्थांमध्ये जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. स्पष्ट भूमिका मांडणारे म्हणून कोरे महायुतीमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात.

Web Title: In the upcoming elections the responsibility lies with Mahayuti Minister Prakash Abitkar, Hasan Mushrif, Chandrakant Patil, and MLA Vinay Kore in Kolhapur district