Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेस देणार ४० नवे चेहरे, पहिल्या दिवशी १३५ जणांनी दिली मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:12 IST2025-12-17T14:11:31+5:302025-12-17T14:12:20+5:30
'या' प्रमुखांनी दिल्या मुलाखती, दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेस देणार ४० नवे चेहरे, पहिल्या दिवशी १३५ जणांनी दिली मुलाखत
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस एकूण जागांपैकी निम्म्या जागांवर नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देणार आहे. म्हणजेच ८१ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १० अशा दहा प्रभागांमधील १३५ इच्छुकांनी मुलाखती देत काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांचे प्रभागातील काम, जनसंपर्क, पक्षामधील कार्य या स्वरुपात मुलाखती झाल्या. गत सभागृहात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार प्रभाग क्रमांक १ ते १०मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दुपारी १:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत झाल्या. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काँग्रेसकडे ३५०हून अधिक जणांनी उमेदवारांची मागणी केली आहे. एका एका प्रभागात डझनभरहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, विक्रम जरग, तौफीक मुल्लाणी, भारती पोवार यावेळी उपस्थित होते.
आजही मुलाखती होणार
प्रभाग क्रमांक ११ ते २०मधील इच्छुकांच्या मुलाखती आज बुधवारी सकाळी ९:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटप झाल्यानंतर दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
...या प्रमुखांनी दिल्या मुलाखती
सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, संदीप नेजदार, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, माणिक पाटील, राजाराम गायकवाड, अर्जुन माने, प्रकाश पाटील, मंगल चव्हाण, कैलास गौडदाब, जय पटकारे, अफजल पीरजादे, धनजंय सांवत, उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, प्रताप जाधव, दीपा मगदूम.
महापालिका निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावेळी एकूण जागांपैकी ५० टक्के नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. पाच - सहा दिवसांत उमेदवार निश्चित केले जातील. - सतेज पाटील, गटनेते, विधानपरिषद, काँग्रेस