Kolhapur-Local Body Election: कागलात शिंदेसेनेप्रमाणे उद्धवसेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:05 IST2025-11-21T20:03:09+5:302025-11-21T20:05:15+5:30
दोन्ही सेना, काँग्रेस एकत्र?

Kolhapur-Local Body Election: कागलात शिंदेसेनेप्रमाणे उद्धवसेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी
कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. बिनविरोध निवड होण्याच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा प्रयोग सुरू झाल्याने शिंदेसेना, उद्धवसेनेनेही आपले सर्व उमेदवार अज्ञातस्थळी नेले आहेत. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीला टक्कर देण्यासाठी त्यांच्या विरोधात दोन्ही शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येण्याबद्दलही गुरुवारी काही चर्चा झाल्या आहेत.
मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीने कागल शहराचे राजकारण झपाट्याने बदलले आहे. मुख्य दोन गटच एकत्र आल्याने त्यांच्या विरोधात तुल्यबळ लढत कोण देणार? हा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला. मात्र, मंडलिक गटाने सर्व जागांवर उमेदवार गोळा करून निवडणुकीत रस कायम ठेवला. तर उद्धवसेनेने नगरसेवकपदासाठी दहा जागांवर व नगराध्यक्ष पदासाठीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. काॅंग्रेसने नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी तीन असे उमेदवारी अर्ज भरले आहेत. गुरुवारी फक्त पाच अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहेत. नगराध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी गर्दी होणार आहे.
नाट्यमय घडामोडींची शक्यता
मुश्रीफ-घाटगे युतीकडे असणारी ताकद लक्षात घेऊन पहिल्यांदा मंडलिक गटाने नंतर उद्धव सेनेनेही आपले उमेदवार कागलमधून हलविले आहेत. त्यातूनही युतीची एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत.
दोन्ही सेना, काँग्रेस एकत्र?
शिंदेसेना नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि उद्धवसेना व राष्ट्रीय काँग्रेस व काही अपक्ष यांना नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे नियोजन करून एकास एक लढती करण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहेत. पण यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी वरिष्ठांची परवानगी अडचणीची ठरत आहे.