Kolhapur Crime: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणास गगनबावड्यात केली अटक, आई- वडिलांवरही गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 11:55 IST2023-03-17T11:54:38+5:302023-03-17T11:55:00+5:30
संशयित मारुती हा नकुशाला वारंवार त्रास देत होता. तो तिच्याकडे बळजबरीने शरीरसुखाची मागणीही करीत होता

Kolhapur Crime: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणास गगनबावड्यात केली अटक, आई- वडिलांवरही गुन्हा
कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील तरुणी नकुशा साऊ बोडेकर (वय १९) हिच्या आत्महत्येप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित मारुती हरी बोडेकर (वय २४) याच्यासह त्याचे वडील हरी बाबू बोडेकर आणि आई विठाबाई हरी बोडेकर (सर्व रा. बोंद्रेनगर, फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारुती बोडेकर याला गुरुवारी (दि. १६) दुपारी गगनबावडा येथून अटक करण्यात आली.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुशा हिने बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याचे समजताच तिला त्रास देणारा संशयित मारुती बोडेकर हा गगनबावड्याला गेला होता. तर त्याचे आई- वडीलही घराला कुलूप लावून निघून गेले होते. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून मारुती बोडेकर याचा शोध घेऊन गुरुवारी दुपारी त्याला गगनबावडा येथून अटक केली. त्याच्या आई- वडिलांचा अद्याप शोध लागला नसल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.
संशयित मारुती हा नकुशाला वारंवार त्रास देत होता. तो तिच्याकडे बळजबरीने शरीरसुखाची मागणीही करीत होता. याच वादातून मारुती आणि त्याच्या आई- वडिलांनी नकुशाला धमकावले होते. आपल्यामुळे आईला त्रास होईल या काळजीने नकुशाने स्वत:चे जीवन संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर करीत आहेत.
बैठकीत तोडगा नाहीच
नकुशा आणि मारुती यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी बोंद्रेनगर परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांची चार दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. उलट त्यानंतरही संशयितांनी नकुशाला धमकावले, अशी माहिती परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना दिली.