Child marriage: बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह सदस्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:49 IST2022-07-27T15:49:00+5:302022-07-27T15:49:24+5:30
कायद्याने २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे गुन्हा

Child marriage: बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह सदस्यांवर कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्याचे आढळल्यास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून काढून टाकले जाईल, तर ग्रामसेवकांचे निलंबन केले जाईल. तसेच शहरात बालविवाह आढळल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा बालसंरक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांच्यासह संबंधित समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्यास सदस्यांना जबाबदार धरून पदावरुन काढून टाकण्याची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तालुका बालसंरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बालविवाह व संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, या कामात हलगर्जीपणा झाल्यास समिती सदस्यांना जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिल्पा पाटील म्हणाल्या, कायद्याने २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे गुन्हा आहे. बालहक्क संरक्षण करणे ही ग्राम बालसंरक्षण समितीची जबाबदारी आहे. ग्रामसेवकांना ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी गावात बालविवाह कायद्याची जागृती करणे, बालविवाह होण्याआधीच रोखणे व बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.