कोल्हापूर: रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून केला खून, पन्हाळा तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:10 IST2022-08-16T15:08:55+5:302022-08-16T16:10:52+5:30
बेशुध्द अवस्थेत असणाऱ्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कोल्हापूर: रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून केला खून, पन्हाळा तालुक्यातील घटना
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : कौंटुबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंट घालून खून केल्याची घटना काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास आसुर्लेपैकी दरेवाडी (ता.पन्हाळा) येथे घडली. बेशुध्द अवस्थेत असणाऱ्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची पन्हाळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मारहाण करून घरात बसलेले संशयित आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ५०) यांना पन्हाळा पोलिसांनी मध्यरात्री राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. वादातून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला असल्याचा कबूली जबाब संशयित आरोपी बाबासो पाटील यांनी दिल्याची माहिती पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाबासो जाधव काही कामधंदा करत नाही. यात व्यसनाधीन असल्यामुळे पैसे मागण्यावरून पती-पत्नींमध्ये वारंवार भांडणे होत होती. काल, सोमवारी रात्री १० वाजता दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोराचे भांडण झाले. पत्नी झोपेत असताना जाधव याने पत्नी अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. तिच्या किंकाळीने बाजूच्या खोलीत झोपलेली सासू आणि मुलगा सुरज जागे झाले. आईला रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत पाहून त्याने तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान कौंटूबिक वादातून पत्नीचा खून झाल्याचा गुन्हा सीपीआर चौकीत नोंद झाल्यानंतर पन्हाळा पोलिसांनी संशयीत आरोपी बाबासो जाधव यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. पुढील तपास पन्हाळा पोलिसा निरीक्षक अरविंद काळे करत आहे.