Kolhapur News: करवीर चावडी कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक, आग लागली की लावली ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:15 IST2025-12-02T13:14:11+5:302025-12-02T13:15:03+5:30
पोलिसांकडून तपास सुरू

Kolhapur News: करवीर चावडी कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक, आग लागली की लावली ?
कोल्हापूर : टाऊन हॉल बागेसमोर कसबा करवीर चावडी कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, एक टेबल आणि दोन खुर्च्या जळून खाक झाल्याचे सोमवारी (दि. १) सकाळी निदर्शनास आले. याबाबत ग्राम महसूल अधिकारी किरण भीमराव आंबुलकर (वय ४८, सध्या रा. कसबा गेट, महाद्वार रोड, कोल्हापूर, मूळ रा. बटकणंगले, ता. गडहिंग्लज) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ते सोमवारी (दि. १) पहाटेच्या दरम्यान झाला. कागदपत्रे जळाली की कोणी जाणीवपूर्वक जाळली, याचा शोध लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसिंगजी रोडवरील कसबा करवीर चावडीतील कर्मचारी शुक्रवारी दुपारी कार्यालय बंद करून बाहेर पडले. सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडले असता आत आगीने काही कागदपत्रे, एक टेबल आणि दोन खुर्च्या जळून खाक झाल्याचे लक्षात आले. एका खोलीतील टेबल-खुर्च्यांसह पडदे आणि कागदपत्रांचे गठ्ठे जळून त्याची राख झाली होती. दुसऱ्या खोलीत एका लोखंडी कपाटातील मधल्या कप्प्यातील कागदपत्रांचे गठ्ठे जळाले होते. त्याच कपाटातील इतर कागदपत्रांना आग लागलेली नाही. खिडकीची काच फुटलेल्या अवस्थेत दिसत होती.
यावरून कोणीतरी जाणीवपूर्वक खिडकीतून आत प्रवेश करून काही ठराविक कागदपत्रे जाळली असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनेची पाहणी करून आगीचे कारण शोधण्यासाठी काही नमुने ताब्यात घेतले.
अधिकाऱ्यांकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, प्रभारी तहसीलदार स्वप्निल पवार, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी तातडीने करवीर चावडीत जाऊन पाहणी केली. विविध शक्यता गृहीत धरून तपास सुरू केल्याची माहिती पोलिस निरीक्षक कन्हेरकर यांनी दिली.
कोणालाच कसे कळले नाही ?
शुक्रवारी दुपारपासून चावडी कार्यालय बंद होते. सोमवारी कार्यालय उघडल्यानंतरच आगीचा प्रकार उघडकीस आला. आग लागल्यानंतर धुराचे लोट उसळले असतील. तरीही शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा प्रकार कसा काय लक्षात आला नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
काय जळाले ?
या कार्यालयात ई-पीक पाहणीची कागदपत्रे, शेतकऱ्यांचे अर्ज, तक्रारी, शासकीय दाखले, चौकशीची प्रकरणे, शासकीय योजनांच्या माहितीची परिपत्रके ठेवली होती. तसेच काही जुन्या कागदपत्रांचेही गठ्ठे होते. आगीत नेमके काय जळाले ? याची यादी तयार करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
करवीर चावडीतील आग कोणत्या कारणांनी लागली. अज्ञातांनी लावली की शॉर्टसर्किटमुळे लागली अशा सर्व शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करण्याची सूचना केली आहे. तसेच याबाबत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासून सर्व बाबी स्पष्ट होतील. ते तपासून पुढील कार्यवाही केली जाईल. - मौसमी चौगुले, प्रांताधिकारी, करवीर