कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे येथील जैन मंदिराजवळ बेकायदेशीर उत्खनन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:54 IST2025-12-05T13:54:36+5:302025-12-05T13:54:49+5:30
उत्खनन थांबवण्याच्या तहसीलदारांना सूचना

कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे येथील जैन मंदिराजवळ बेकायदेशीर उत्खनन
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे येथील प्राचीन जैन मंदिराजवळ सोहम भांडे ही व्यक्ती बेकायदेशीरपणे उत्खनन करत असल्याचे उघडकीस आले आहे. हे उत्खनन थांबवून संबंधितास योग्य ती समज देण्यात यावी, असे पत्र पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी करवीर तहसीलदारांना गुरुवारी पाठवले.
कोगेतील जैन मंदिर हे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या मंदिर परिसरात भांडे या व्यक्तीकडून अवैधरित्या तांत्रिक पद्धतीने उत्खनन होत असल्याचे समाजमाध्यमाद्वारे पुरातत्त्व विभागाला समजले. कोणत्याही प्राचीन स्मारक व मंदिराजवळ तांत्रिक पद्धतीने उत्खनन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची रीतसर परवानगी आवश्यक असते. राज्य पुरातत्त्व विभागासही याबाबत अवगत करणे आवश्यक असते.
परंतु संबंधितांनी या उत्खननासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिक यंत्रणेला आदेश देऊन हे उत्खनन तातडीने थांबविण्यात यावे आणि भविष्यात या व्यक्तीकडून अशाप्रकारे कोणत्याही प्राचीन स्मारकाजवळ उत्खनन केले जाणार नाही, याबाबत संबंधितास योग्य समज द्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जुन्या मूर्ती, रचनेला धक्का
यांत्रिक पद्धतीने जर एखाद्या जुन्या स्मारकाच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी उत्खनन केल्यास गाडल्या गेलेल्या मूर्ती किंवा रचनेला धक्का लागू शकतो. या मूर्तींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय उत्खननास परवानगी दिली जात नसल्याचे सांगण्यात आले.