आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कराल तर दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:54+5:302021-02-05T06:57:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील बळीराजाच्या फौजेने आता केवळ संचलन केले, जर दिल्लीतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर ...

If you try to crush the movement, march towards Delhi | आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कराल तर दिल्लीकडे कूच

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कराल तर दिल्लीकडे कूच

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील बळीराजाच्या फौजेने आता केवळ संचलन केले, जर दिल्लीतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीकडे कूच करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आज, मंगळवारी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. कोल्हापुरातील दसरा चौकात आल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसह विरोधी पक्षांवर प्रहार केला. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

राजू शेट्टी म्हणाले, आज, मंगळवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलनापर्यंत जाता येऊ नये म्हणून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली भोवतीच्या तीन-चार राज्यांचे आंदोलन असे केंद्र सरकारकडून भासवले गेले. मात्र दिल्लीतील शेतकरी एकटा नाहीतर संपूर्ण देशातील बळीराजा त्यांच्या पाठीशी उभा आहे, हेच या रॅलीने दाखवून दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे आशीर्वाद घेऊन सांगलीतून रॅली निघाली. त्यांनी गोऱ्या इंग्रजांविरोधात लढा दिला. आता काळ्या इंग्रजांविरोधात लढत आहे. त्याकाळी इस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांचे शोषून केले आता ‘आदानी आणि अंबानी’ कंपनी आमचे शोषण करीत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे आदी सहभागी झाले होते.

राज्यपाल पर्यटनासाठी गोव्याला

मुंबईत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून राज्यपालांना निवेदन देण्याचे नियोजित होते. मात्र शेतकऱ्यांची भेट घेण्याऐवजी राज्यपाल कोश्यारी हे गोव्याला गेल्याचे समजते. ते पर्यटनासाठी गेले की इतर कशासाठी हे माहीती नाही, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार व त्यांनी नेमलेली यंत्रणाही गंभीर नसल्याचे स्पष्ट होते, असे शेट्टी यांनी सांगितले.

विरोधी पक्षातही बोलण्याची हिंमत नाही

सहा महिन्यांपासून आम्ही या कायद्याला विरोध करत आहोत. दुर्दैवाने ज्या पद्धतीने संसदेत विरोध अपेक्षित होता, तो झाला नाही. सत्ताधारी आदानी, अंबानींच्या खिशात असल्यासारखे वागतात, तर विरोधी पक्षात त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. असे असले तरी आम्ही शेतकरी ही लढाई लढूच, असे शेट्टी यांनी सांगितले.

उसाच्या कांडक्याला झेंडा

उसाच्या कांडक्याला स्वाभिमानी पक्षाचा झेंडा आडकवला होता. ट्रॅक्टरवर अशा प्रकारचे झेंडे फडकवत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते, शेतकरी घोषणा देत आले होते.

मार्गावरील विविध ठिकाणी स्वागत

ट्रॅक्टर रॅली सांगलीतून कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गावांच्या प्रवेशद्वारावर माजी खासदार राजू शेट्टी यांचे फेटा व पुष्पहार घालून स्वागत करत आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.

Web Title: If you try to crush the movement, march towards Delhi