Kolhapur: ज्यांना जायचं त्यांनी आताच निर्णय घ्या, फसवाल तर करेक्ट कार्यक्रम करू; सतेज पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:58 IST2025-07-28T11:58:35+5:302025-07-28T11:58:59+5:30
निर्धार मेळाव्यात काँग्रेसचे मिशन महापौर

Kolhapur: ज्यांना जायचं त्यांनी आताच निर्णय घ्या, फसवाल तर करेक्ट कार्यक्रम करू; सतेज पाटील यांचा इशारा
कोल्हापूर : राजकारणात माणसं येतात आणि जातात, मात्र माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील आहे. ज्यांनी निर्णय घ्यायचा त्यांनी घेतलाय, ज्यांना जायचं आहे त्यांनी आताच निर्णय घ्यावा. मात्र, ऐन निवडणुकीत हिकडं तिकडं कराल तर त्या प्रभागात येऊन तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, असा गर्भित इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी दिला.
गेलेल्यांबाबत मी विचार करत नाही, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कशालाच भीत नाही, या शब्दांत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनाही फटकारले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा शनिवारी काँग्रेस कमिटीत निर्धार मेळावा झाला. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते.
सतेज पाटील म्हणाले, ज्यांना पदे मिळाली, त्यांनी माझ्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका ठेवावी. अनेकजण सोडून गेले असले तरी मी त्याचा विचार करत नाही. जनता माझ्यासोबत असल्याने मी संघर्ष करायला कधीच भीत नाही. त्यामुळे ज्यांना वेगळी भूमिका घ्यायची आहे त्यांनी आताच घ्यावी. निवडणुकीच्या आधी दहा दिवस काही वेगळा निर्णय घेऊन मला फसवाल तर तुमच्या प्रभागात येऊन तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडणार नाही.
शाहू छत्रपती म्हणाले, कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन काँग्रेसने केलेल्या कामाची माहिती देणे गरजेचे आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आतापासून तयारीला लागा. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर, दुर्वास कदम, भूपाल शेटे, आनंद माने, अमर समर्थ, तौफिक मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी महापौर ॲड. महादेव आडगुळे, मारुतराव कातवरे, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, बाळासाहेब सरनाईक, दौलत देसाई, माजी महापौर भीमराव पवार, शोभा बोंद्रे, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, अश्विनी रामाणे, स्वाती येवलूजे, भारती पोवार, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, वैभवी जरग, सूरमंजिरी लाटकर आदी उपस्थित होते.
प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करणार
येणाऱ्या निवडणुकीत प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. प्रभागातील समस्या जाणून घेऊन प्रत्येक प्रभागात काय आवश्यक आहे याची सोडवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवाच
ज्यांना पदे दिली त्यांनीच सत्ता नसतानाच्या काळात तुम्हाला सोडले, कोण निष्ठावंत आणि कोण गद्दार हे आता ठरले असून पदे देऊनही, सत्तेचा लाभ घेऊनही त्यांनी गद्दारी केली त्यांना आता कायमचा धडा शिकवाच, अशी मागणी कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे केली.