पक्के घर असेल, तर तो यादीत नसेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:59+5:302021-09-22T04:27:59+5:30

कोल्हापूर : गावात कोणाचाही वाईटपणा नको म्हणून ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर पाहिजे ...

If there is a permanent home, it will not be on the list! | पक्के घर असेल, तर तो यादीत नसेल!

पक्के घर असेल, तर तो यादीत नसेल!

कोल्हापूर : गावात कोणाचाही वाईटपणा नको म्हणून ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर पाहिजे आहे त्या सगळ्यांची नावे जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आली. परंतु आता येत्या दहा दिवसांत जिल्ह्यात जागेवर जाऊन याबाबत पडताळणी करण्यात येणार आहे. ‘ज्याचे पक्के घर असेल, त्याचे नाव नव्या यादीत नसेल’ या धोरणात्मक निर्णयानुसार आता नवी यादी तयार करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी या योजनेतून ज्यांना घर हवे आहे, अशांकडून अर्ज मागवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून असे १ लाख ८८ हजार जणांनी अर्ज केले. गावसभेनेच ही यादी दिली होती. ज्यांची पक्की घरी आहेत अशांचीही नावे या यादीत घालण्यात आली. ज्यांच्या चारचाकी गाड्या, घरात मोबाईल, वाहने, फ्रीज, टीव्ही आहेत अशांचीही नावे या यादीत होती. गावसभेत कोणाचा वाईटपणा घ्यायचा म्हणून ही सर्व नावे पाठवण्यात आली.

परंतु या छाननीसाठी जी संगणकीकृत केंद्रीय पध्दत आहे, त्यानुसार आधार, शिधापत्रिका, आरटीओकडील माहिती यासह अन्य माध्यमातून जवळपास ८६ हजार नावे या यादीतून काढून टाकण्यात आली. जी १ लाख २ हजार उर्वरित नावे आहेत, त्यातील सुमारे १३ हजारजणांनी रमाईसह अन्य घरकुल योजनांमध्ये लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही नावेही यादीतून कमी झाली असून, आता केवळ ८९ हजार नावे शिल्लक आहेत.

त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये गावोगावी जाऊन इच्छुकांच्या घरासमोर पडताळणी होणार असून, जर एखाद्याचे नाव या यादीत असेल आणि त्याचे पक्के बांधलेले घर असेल, तर नव्या यादीतून त्याचे नाव कमी केले जाणार आहे. यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार असून, तालुका पातळीवरील विविध विभागांचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांना याची जबाबदारी देण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनाही या भेटीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे पुरवण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

चौकट

पुन्हा यादी गावसभेसमाेर

पडताळणीमध्ये ज्यांची पक्की घरे आहेत, हे स्पष्ट होईल त्यांचे नावे ८९ हजारांमधून वगळण्यात येणार आहेत. यानंतर पुन्हा नवी पात्र लाभार्थ्यांची यादी गावसभेसमोर येणार आहे. त्यातून आक्षेप नसलेल्या नावांची-पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल आणि नंतर मग आवास योजना अंमलबजावणीसाठी ही यादी वापरण्यात येणार आहे.

Web Title: If there is a permanent home, it will not be on the list!