Kolhapur: काळम्मावाडी योजनेचे पाणी बंद झाल्यास शिंगणापूर येथून उपसा, दुरुस्तीचे काम वेगाने सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:16 IST2025-06-12T18:16:19+5:302025-06-12T18:16:41+5:30
शिंगणापूर योजनेवरील पंप, ट्रान्सफॉर्मर, स्विच यार्ड दुरुस्ती वेगाने सुरु

Kolhapur: काळम्मावाडी योजनेचे पाणी बंद झाल्यास शिंगणापूर येथून उपसा, दुरुस्तीचे काम वेगाने सुरु
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेत वारंवार बिघाड होऊन पाणीपुरवठा बंद झाल्यास शिंगणापूर योजनेवरील उपसा पंप तातडीने कार्यान्वित करून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेची दुरुस्ती वेगाने करण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण करून शिंगणापूर योजना सज्ज ठेवली जाणार आहे.
कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन टाकून शहरवासीयांना पाणी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरू झाल्यापासून काही ना काही कारणाने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे दोन दोन दिवस नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. यावर पर्याय म्हणून शिंगणापूर येथील उपसा पंपदेखील सज्ज ठेवावेत. जेेव्हा काळम्मावाडी योजनेत बिघाड होईल, तेव्हा तत्काळ शिंगणापूर योजनेवरून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पुढे आली होती. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनीदेखील तशा सूचना प्रशासनास दिल्या होत्या.
पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर योजना सज्ज ठेवण्याकरिता देखभाल दुरुस्तीसह तीन नवीन पंप बसविणे आवश्यक होते. पाणीपुरवठा विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन मंडळाकडे २ कोटी ९० लाखांचा प्रस्ताव दिला होता. त्यास निधीही प्राप्त झाला. त्याची कामेही आता सुरू झाली आहेत. तीन पंप नवीन खरेदी करून बसविण्यात आले आहेत. कसबा बावड्यासाठी असलेल्या दोन पंपांपैकी एक पंप दुरुस्ती करण्यात येत आहे.
महावितरणच्या सबस्टेशनमधील ३३ के.व्ही.चा ट्रान्सफॉर्मर व स्विच यार्ड दुरुस्तीचे तसेच ओव्हर ऑइलिंगचे काम सुरू आहे. या कामास लागणारे साहित्य जागेवर आले असून, जोडकाम सुरू झाले आहे. ही सर्व कामे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होतील. जुलैपासून शिंगणापूर पाणीपुरवठा योजना कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा सुरू करण्यास सज्ज असेल, असे सांगण्यात आले.
स्टँडबाय म्हणून वापर
- काळम्मावाडी योजनेला स्टँडबाय म्हणून शिंगणापूर योजना चालविणार.
- शिंगणापूर योजनेवर ५४० अश्वशक्तीचे सहा पंप
- सहा पंपांपैकी चार पंप २४ तास कार्यान्वित, दोन स्टँडबाय राहतील.
- ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे ४२ लाख महापालिका खर्च करणार
महापूर आल्यास शिंगणापूरही बंद
पंचगंगा नदीला महापूर आला की शिंगणापूर योजनाही बंद राहते. त्यामुळे या योजनेवरील सर्व पंप, तेथील इमारत वर उचलून घ्यावी, अशी मागणी झाली होती. परंतु, या कामास २८ ते ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जर काळम्मावाडीचे पाणी मिळत असेल, तर पुन्हा ३० काेटी खर्च करण्याला अर्थ नाही, म्हणून हे काम मागे पडले.