Kolhapur: कोणी वाईट बोललं तर जागेवर विसरा, आनंदाने जगा; ह..भ प. इंदोरीकर महाराज यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:44 IST2025-05-17T17:43:58+5:302025-05-17T17:44:57+5:30
कोल्हापुरात कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंडवर रंगला किर्तन सोहळा

Kolhapur: कोणी वाईट बोललं तर जागेवर विसरा, आनंदाने जगा; ह..भ प. इंदोरीकर महाराज यांचा सल्ला
कसबा बावडा: आपल्याबद्दल काय घडलं, कोणी वाईट बोललं तर जाग्यावर विसरा आणि आनंदाने जगा. असा सल्ला ह. भ. प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी येथे दिला. आपलं शरीर जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. शरीरावर अन्याय झाला की रोग होतो. त्यामुळे आपल्या शरीरावर प्रेम करा. शरीर चांगलं सांभाळा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
येथील पॅव्हिलियन ग्राउंडवर शुक्रवारी सायंकाळी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून हा सल्ला दिला. डी. वाय. पाटील ग्रुप, श्रीराम विकास सेवा संस्था, तुकाराम महाराज मंडप, ज्ञानेश्वर महाराज मंडप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, शांतादेवी डी पाटील, श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील ,उपसभापती अनंत पाटील आदी उपस्थित होते. कीर्तनाला प्रचंड गर्दी झाली होती.
इंदोरीकर महाराज म्हणाले, शरीराकडे दुर्लक्ष करून संपत्ती मिळवण्याच्या मागे अनेक जण लागतात. पण अती संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी बनवण्या सारखं आहे. तुमच्या अंगातील ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपला. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे लक्षात ठेवा आणि शरीराला सांभाळा. ८० टक्के लोकांनी शरीरावर अन्याय केलाय. म्हणून लोक आजारी पडतात.
आजच्या कलियुगात माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. असे सांगून इंदोरीकर महाराज म्हणाले कोणावरही अन्याय करू नका. नम्रता ठेवा. चांगले कर्म करत रहा. कर्म हाच देव आहे. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आली तर तुम्हाला कोणाची दया येणार नाही, आणि दया आली तर संपत्ती येणार नाही.मात्र जर या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आल्या तर मात्र तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अति पैशामुळे जर तुम्हाला घमेंड आली तर तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. रागावर नियंत्रण ठेवा. दोन मिनिटांचा राग तुमचे जिंदगी संपू शकतो.
डी वाय पाटील घराण्याबद्दल बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले, या आदर्श गावाला पाटील नावाचे नेतृत्व लाभलं आहे. संकटाच्या छातीवर पाय ठेवून पुढे गेलेले हे घराणं आहे. आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. दरम्यान किर्तनासाठी उत्तम दर्जाची साऊंड सिस्टिम, उत्कृष्ट लाईट, भव्य स्टेज उभारण्यात आले होते. कीर्तनासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून लोक आल्याने पॅव्हेलियन ग्राउंडवर प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या ही लक्षणीय होती.
मुलांचा मोबाईल बंद ठेवा..
इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात ४० टक्के मुलं मोबाईलवर रमी खेळून भिकारी झाले असल्याचे सांगून हा मोबाईल शाळेत बंद ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन करावे अशी सूचना केली. यावर आमदारांनी येत्या जून पासून या सूचनांची जनजागृती करून अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले.