Kolhapur Politics: ...तर दोस्त म्हणून डांगोरा पिटला असता; मंत्री मुश्रीफांच्या ‘टिप्पणी’नंतरही आबिटकरांचे ‘मौन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:00 IST2025-11-17T17:59:51+5:302025-11-17T18:00:36+5:30
तोच फोटो पाठवा

Kolhapur Politics: ...तर दोस्त म्हणून डांगोरा पिटला असता; मंत्री मुश्रीफांच्या ‘टिप्पणी’नंतरही आबिटकरांचे ‘मौन’
राम मगदूम
गडहिंग्लज : नगरपालिका निवडणुकीची धामधूम असतानाही मी व सतेज पाटील दोघेही वेळेवर आलो. पालकमंत्री आबिटकरही आले बरे झाले नाही तर ‘दोस्त-दोस्त’ म्हणून राज्यभर डांगोरा पिटला असता, अशी टिप्पणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. मात्र, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्याची जिल्ह्यातील ‘बदलत्या’ राजकारणात विशेष चर्चा सुरू आहे.
निमित्त होतं ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैस विक्री केंद्राच्या उद्घाटनाचं. पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह निमंत्रण पत्रिकेवर नाव असलेल्या जिल्ह्यातील डझनभर नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. मात्र, एकमेकांच्या विरोधी पक्षात असूनही जिल्ह्याच्या राजकारणातील ‘दोस्ताना’ जपणारे मुश्रीफ-सतेज पाटील दोघेही वेळेवर उपस्थित होते.
राजकीय नेत्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना उशीर होतो; परंतु दोन्ही नेते लवकर आल्यामुळे घोळ झाला, असे विधान ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले. नगरपालिकेच्या धामधुमीतही आम्ही वेळेवर आलो, किमान संचालकांनी तरी वेळ पाळावी, असा टोला मंत्री मुश्रीफांनी लगावला.
मी व मंत्री मुश्रीफ दोघांनीही म्हशी घेतल्या आहेत. त्यामुळे कर्तव्य म्हणून ‘सुपरवायझर’नीही म्हशी घ्याव्यात. ‘लाडकी बहिणी’प्रमाणे ‘लाडका सुपरवायझर’, जातिवंत म्हैस खरेदी अनुदानासह विविध योजना मनापासून राबवा. ‘गोकुळ’ ही मातृसंस्था असून, झाड जगलं तरच आपण जिवंत राहू, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
उसासह जिल्ह्यात अन्य पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘गोकुळ’ची प्रगती हीच शेतकऱ्यांची व दूध उत्पादकांची प्रगती आहे. ‘गोकुळ’मुळेच जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे,’ अशा मोजक्या शब्दांतच आबिटकरांनी भाषण आटोपते घेतले.
मुश्रीफ म्हणाले..
- आबिटकरांच्या मतदारसंघात आजरा एकच नगरपंचायत आहे. माझ्या मतदारसंघातील ३ नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. कार्यक्रमानंतर ‘चंदगड’लाही जाणार आहे.
- सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, तो आमचा घातवार आहे. पक्षाचा एबी फॉर्म मिळणार नाही, ते आम्हाला शिव्या घालणार आहेत. त्या पचविण्याची ताकद परमेश्वराने आम्हाला द्यावी.
- ‘आबाजीं’चा मुलगा, डोंगळेंची मुलगी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार आहेत. निवडणुकीच्या जोडणीमुळेच डोंगळेंना उशीर झाला असावा.
- सोमवारी (दि. १७) सुप्रीम कोर्टात नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुनावणी आहे. त्यामुळे निवडणुका पुढे जातील, असे सतेज पाटील यांना वाटते. परंतु, निकाल येईपर्यंत उमेदवारी दाखल करणे सुरूच ठेवावे लागेल.
लाडक्या बहिणींचा धसका!
लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रात कमाल केली. त्यांचा धसका घेतल्यामुळेच सतेज पाटील यांनी भाषणात लाडक्या बहिणींचा उल्लेख केला; परंतु ‘बिहार’मध्येही लाडक्या बहिणींनीच धमाल उडवून दिली, अशी मार्मिक टिप्पणीही मुश्रीफ यांनी केली.
तोच फोटो पाठवा
आबिटकर येईपर्यंत भाषण सुरू ठेवावे, अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांना करण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी आपले भाषण लांबविले. आबिटकर येताच त्यांना आमच्या दोघांच्या मध्ये बसवा आणि तोच फोटो पेपरला पाठवा, अशी सूचना त्यांनी संयोजकांना केली.