Kolhapur ZP Election: महायुती झाली नाही तर स्थानिक आघाडीतून लढण्याची तयारी करा, शिंदेसेनेच्या नेत्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:41 IST2026-01-19T19:41:00+5:302026-01-19T19:41:45+5:30
महायुती झाली तर आम्हालाच झुकते माप हवे...

Kolhapur ZP Election: महायुती झाली नाही तर स्थानिक आघाडीतून लढण्याची तयारी करा, शिंदेसेनेच्या नेत्यांची सूचना
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली नाही तर समविचारी पक्षांशी स्थानिक आघाडी करून रिंगणात उतरण्याची तयारी करा, महायुती झाली तर कोणती जागा शिंदेसेनेकडे ठेवायची ? भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला कोणत्या जागा द्यायच्या? यांच्यावरही मतदारसंघनिहाय एकमत करा, अशा सूचना शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक आदी नेत्यांनी इच्छुकांना दिल्या. शंभर फुटी रोडवरील शिंदेसेनेच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद, पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुकांच्या रविवारी मुलाखती झाल्या. शिंदेसेनेचे आजी, माजी आमदार, खासदार, नेत्यांनी मुलाखती घेतल्या.
सकाळी दहापासूनच मुलाखतींना सुरुवात झाली. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इच्छुक आले होते. प्रत्येकाला नेते प्रश्न विचारून लढण्यासाठीची पात्रता तपासत होते. तुमच्या मतदारसंघात किती गावे येतात, कोणती गावे मोठी आहेत? किती वर्षांपासून पक्षात काम करता, आधी कोणत्या पक्षात काम केले आहे का?, विरोधातील उमेदवार कोण असेल? महायुती म्हणून लढल्यास आपण कोणत्या जागा घ्यायच्या इतर पक्षाला कोणत्या द्यायच्या अशी विचारणा केली. उमेदवारही सोबत सामाजिक, राजकीय कामांचा बायाेडाटा घेऊन आले होते. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. इच्छुक महिलाची संख्याही लक्षणीय होती.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते. यामुुळे सक्षम उमेदवारास उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही राहण्याची भूमिका मुलाखत घेण्याऱ्या सर्वच नेत्यांमध्ये दिसून आली.
महायुती झाली तर आम्हालाच झुकते माप हवे...
महायुती म्हणून लढलो तरी आमचा प्रभाव असलेल्या भागात जिल्हा परिषदेसाठी आम्हालाच झुकते माप हवे, पंचायत समितीसाठी तडजोड करू पण जिल्हा परिषदेसाठी नको, अशी आग्रही भूमिकाही अनेक इच्छुकांनी मांडली. जर असे झाले नाही तर स्वतंत्र लढू, असे अनेकांनी सांगितले. इच्छुकांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदासंघातून शिंदेसेनेच्या उमेदवारास किती मतदान झाले होते याचीही माहिती देत होते. याचा संदर्भ देताना नेते या आकडेवारीवर जाऊ नका, प्रत्येक निवडणूक वेगळी असते, असेही सांगत होते.