Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ
By राजाराम लोंढे | Updated: May 23, 2025 16:14 IST2025-05-23T16:13:25+5:302025-05-23T16:14:20+5:30
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार'

Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ
कोल्हापूर : के. पी. पाटील यांच्या रुपाने मला मोठा भाऊ परत मिळाला अशी भावना व्यक्त करत ‘के. पी.’ व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच मी जिल्ह्याचा नेता झालो. या दोघांमधील वाद मिटवून कोणत्याही परिस्थितीत त्यांना पक्षातून बाहेर सोडणार नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीहसन मुश्रीफ यांनी सांगितले.
माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मुधाळ (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामुळेच हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता आहे. या दोघांमधील वाद मिटवला गेला पाहिजे. मी या दोघांनाही पक्षाबाहेर सोडणार नाही.
जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या ठिकाणी एकत्र जमत असेल तिथं महायुती म्हणून आणि जमत नसेल त्याठिकाणी स्वतंत्र लढवली जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
‘के. पी.’ स्वभावात बदल करतील
के. पी. आणि ए. वाय. यांना एकत्र आणले पाहिजे, असे म्हटल्यानंतर ‘के. पी.’ माझ्यावर खवळून उठतील. ‘के. पीं.’चा रोखठोक स्वभाव आहे, ते एखादे काम होत नसेल तर तोंडावर सांगतात. मात्र, राजकारणात असा स्वभाव चालत नाही. लोकांना बघूया, काम करूया असं सांगावं लागतं, लोकांच्या कामासाठी प्रयत्न करावे लागतात. भविष्यात आपल्या स्वभावात बदल करतील असा विश्वास व्यक्त करतो, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.